रामल्ला- एकदिवसाच्या ऐतिहासिक पॅलेस्टाइन दौ-यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना शनिवारी पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी 'ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाइन' या सन्मानाने गौरवले. भारत आणि पॅलेस्टाइनमधले संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे योगदान दिलेय त्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शनिवारी दुपारी जॉर्डनमार्गे मोदी पॅलेस्टाइनच्या रामल्ला शहरामध्ये दाखल झाले.
पॅलेस्टाइनला भेट देणारे मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. रामल्लामध्ये दाखल होताच हा ऐतिहासिक दौरा असून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील असे टि्वट पंतप्रधान मोदींनी केले. त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष यासर अराफत यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. त्यांनी यासर अराफत संग्रहालयालाही भेट दिली.
राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्याबरोबर पत्रकार परिषदेला संबोधित करताना मोदींनी पश्चिम आशियात शांतता नांदेल अशी भारताला अपेक्षा असल्याचे सांगितले. पॅलेस्टाइन जनतेच्या हितासाठी भारत कटिबद्ध असल्याचे मोदी म्हणाले. इस्त्रायलबरोबर शांतता संबंध प्रस्थापित होण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिकेवर अवलंबून आहोत असे पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी सांगितले.
मागच्या वर्षी जुलै महिन्यात मोदी इस्त्रायल दौ-यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पॅलेस्टाइनला भेट द्यायचे टाळले होते. त्यावरुन मोदी सरकारच्या हेतूबद्दलही अनेकांनी शंका व्यक्त केली होती. पण आता पॅलेस्टाइनचा दौरा करुन भारतासाठी दोन्ही देश सारखेच असल्याचा संदेश मोदींनी दिला आहे.