काठमांडू- नेपाळमधील पशुपतीनाथ, जनकपूरप्रमाणे अत्यंत प्रसिद्ध स्थान असणाऱ्या मुक्तीनाथ मंदिराला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आहे. या स्थानाला हिंदू आणि बौद्ध दोन्ही समुदायांमध्ये विशेष महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मंदिराला भेट देणारे पहिले आंतरराष्ट्रीय नेते आहेत, त्यांनी या मंदिरात पूजाही केली. तसेच त्यांनी बागमती नदीच्या काठावर असणाऱ्या पशुपतीनाथाचेही दर्शन घेतले. पशुपतीनाथाचे मंदिर हे हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असून नेपाळमधील सर्वात प्राचीन शिवमंदिर म्हणून ते ओळखले जाते. पशुपतीनाथाच्या मंदिरात नरेंद्र मोदी यांनी अभ्यागताच्या वहीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच त्यांना मंदिराची प्रतिकृती भेटही देण्यात आली.मुक्तीनाथ मंदिर हे समुद्रसपाटीपासून 12,172 फूट उंचीवर आहे. या मंदिरात विष्णूदेवांची सोन्याची मूर्ती असून तिचे मुक्तीनाथ म्हणून पूजन केले जाते. या मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले परदेशी पाहुणे आहेत असे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी कालच सांगितले होते.काल नरेंद्र मोदी यांनी जनकपूर येथे जानकी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ते दुपारी नेपाळची राजधानी काठमांडू येथे पंतप्रधान पोहोचले. काठमांडूमध्ये नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी व उपराष्ट्रपती नंदा बहादूर पन यांची त्यांनी भेट घेतली. तसेच नेपाळचे परराष्ट्रमंत्री ज्ञावली यांचीही त्यांनी भेट घेतली. काल संध्याकाळी नेपाळचे पंतप्रधान के. पी ओली यांच्याबरोबर शिष्टमंडळासह विविध विषयांवर चर्चा केली. 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेल्या अरुण 3 प्रकल्पाची पायाभरणीही त्यांच्याहस्ते करण्यात आली. या प्रकल्पातून 900 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्माण होणार आहे.
नेपाळमधील मुक्तीनाथ मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 1:47 PM