लंडन - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. तत्पूर्वी देशाच्या 75 व्या स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने तिरंगा ध्वज फडकावत देशाचे अमृत महोत्सवी वर्षे साजरे केले. मोदींनी इकडे स्वातंत्र्य दिनाचे सेलिब्रेशन केले असता, तिकडे लंडनमध्ये अनिवासी भारतीयांनी मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासंदर्भात घोषणाबाजी करत, बॅनरबाजीही करण्यात आली आहे.
लंडनच्या वेस्टमिन्टर ब्रीजवरुन भारतीय नागरिकांना मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजधानीतील लाल किल्ल्यावरुन भाषण केल्यानंतर, स्वातंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सेलिब्रेशनचे औचित्य साधूनच अनिवासी भारतीयांनी मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पुलावरुन मोठा बॅनरही त्यांनी झळकवला आहे. त्यामध्ये, Resign Modi असा मजकूर त्यांनी लिहिला आहे.
युनायडेट किंगडममधील डायस्पोरा गटाच्या भारतीय नागरिकांनी मोदींच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत आपला विरोध दर्शवला आहे. या ग्रुपने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात आपल्या या निषेधाबद्दलची अनेक कारणे दिली आहेत. त्यामध्ये, धार्मिक तेढ, शेती क्षेत्राचे कॉर्पोरेटीकर, कोरोना हाताळण्यात आलेलं अपयश, काश्मीरमधील भारताचा वसाहतवाद यांसह अनेका कारणांचा उल्लेख या पत्रकात करण्यात आला आहे. या गटाने युकेतील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर मेणबत्ती लावूनही मोदी सरकारचा निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत असून ट्विटरवर resigne modi हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.