नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर श्रीनगरच्या सचिवालयावर भारताचा तिरंगा डौलानं फडकला आहे. कलम 370 हटविल्यानंतर लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्यात आला आहे. तसेच अन्य राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीर येथेही दर 5 वर्षांनी विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. भारत सरकारने घेतलेला हा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पाकिस्तानचा तिळपापड झाला असून पंतप्रधान इम्रान खानसह त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री बेताल वक्तव्य करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. तसेच काश्मीर मुद्दा हा आमचा अंतर्गत विषय असल्याचं मोदींनी पुन्हा एकदा ट्रम्पना सांगितलं. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला होता. ते म्हणाले, काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आता पुढच्या महिन्यात हा मुद्दा जागतिक स्तरावर UNGA मध्ये उपस्थित करणार आहोत.
काश्मीरसाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास आम्ही तयार आहोत. दोन्ही देशांकडे आण्विक शक्ती, त्याचा वापर केल्यास जगात हाहाकार माजेल, इम्रान खान यांनी अप्रत्यक्षरीत्या भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. आता, बालाकोटसारखे हल्ले भारत पुन्हा करू शकणार नाही. जोपर्यंत काश्मीर स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत काश्मीरचा मुद्दा आम्ही लावून धरू, असंही इम्रान खान यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, आज पाकिस्तानने भारतीय वायूसेनेला परवानगी नाकारण्याच्या विचारधीन आहे. पाकिस्तानमधून अफगानिस्तान येथे जाण्यास पाकिस्तान सरकार भारतीय एअर कंपन्यांना मज्जाव घालण्याची भूमिका घेण्याचा विचार करत आहे. पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. तसेच, सुरुवात मोदींनी केली होत, आता शेवट आम्ही करणार, असेही चौधरी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. भारतासाठी पाकिस्तानचे एअरस्पेस बंद करण्याचा विचार पाकिस्तान सरकार करत आहे. तसेच, भारत आणि अफगानिस्तान यांच्यातील व्यापारी संबंधांनाही आळा घालण्याचा डाव पाकिस्तान सरकारचा आहे. तेथील कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा झाली आहे.