अबुधाबी- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅलेस्टाइनच्या दौ-यानंतर आता संयुक्त अरब अमिराता(यूएई)ची राजधानी अबुधाबीमध्ये दाखल झाले आहेत. अबुधाबीमध्ये त्यांनी आज पहिल्यांदा वॉर मेमोरियलमध्ये वाहत अल करमा यांना श्रद्धांजली वाहिली. तेथे मोदींनी अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपूजन केले. त्यानंतर त्यांनी दुबईतल्या ऑपेरा हाऊसमधून भारतीयांशी संवाद साधला.ते म्हणाले, भारताला जगात सर्वोच्च स्थान मला मिळवून द्यायचं आहे. 21वं शतक हे भारताचं असेल. नोटाबंदी हे गरिबांनीही योग्य दिशेनं उचललेलं पाऊल असल्याचं मानलं आहे. लोकांच्या आवडीचे नव्हे, तर फायद्याचे निर्णय घेणं गरजेचं आहे. चार वर्षांत देशाचा आत्मविश्वास वाढला असून, निराशा आणि समस्यांनाही आम्हाला तोंड द्यावं लागलं आहे. परंतु या सर्व गोष्टींवर मात करत भारत विकासाचे नवनवे शिखर गाठतो आहे. अबुधाबीमध्येही सेतूच्या स्वरुपात मंदिर निर्माण केलं जातंय. हे मानवी भागीदारीचं उत्तम उदाहरण आहे. अबुधाबीतलं हे मंदिर भव्य असेल.अबुधाबीमध्ये भारतीय समुदायातील 30 लाखांहून अधिक लोक आहेत. भारतीय लोकांना राहण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केल्याबद्दल मी अबुधाबीच्या प्रिन्सचे आभार व्यक्त करतो. गेल्या वेळी मी आलो होतो, तेव्हा मंदिर बनवण्यास सुरुवात झाली होती. भारताचं खाडीकिनारील देशांशी चांगले संबंध राहिले आहेत. आमचं नातं फक्त आयात आणि निर्यात करण्यापुरतं नाही, तर चांगल्या भागीदाराचं राहिलं आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यावेळी मोदींना ऐकण्यासाठी भारतीय वंशाचे 30 लाखांहून अधिक लोकांनी ऑपेरा हाऊसमध्ये गर्दी केली होती.
मोदींनी केले आबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 1:08 PM