पंतप्रधान नरेंद्र मोदींनीलक्षद्वीप समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारला. यावेळी, त्यांनी समुदात डुबकी घेतली, पण मोदींची ही डुबकी भारतातील पर्यटन क्षेत्राला कलाटणी देणारी ठरत आहे. कारण, मोदींनी ज्या लक्षद्वीप बेटावरील समुद्रकिनाऱ्यावरुन समुद्राची गारगार हवा खाल्ली, ज्या रेतीवरुन पाऊले टाकत भ्रमंती केली. ज्या लाटांनी उसळणारं पाणी अंगावर घेतलं, त्या लक्षद्वीप येथील समुद्रास्थीत सौंदर्याने आता मालदीवला इर्ष्या निर्माण झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्षद्वीप बेटीवरील, समुद्रकिनाऱ्यावरी फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. विशेष म्हणजे मोदींचे हे फोटो विदेशातील नागरिकांसाठीही चर्चेचा विषय ठरत आहेत. मोदींनी लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना देण्याचं आवाहनही देशावासीयांना केलं होतं. त्यातच, हा परिपाक दिसून येत आहे.
''जे लोक एडव्हेंचर करू इच्छितात, त्यांच्या यादीत लक्षद्वीप असायलाच हवं. मी स्नॉर्कलिंगचा प्रयत्न केला, हा आनंदी अनुभव होता'', असेही मोदींनी म्हटले होते. मोदींचे हे फोटो पाहून विदेशातही लक्षद्वीप पर्यटनाची उत्सुकता वाढीस लागली आहे. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये कुठेही दुसऱ्या देशाचं नाव घेतलं नाही. मात्र, भारतीय नेटीझन्सने चीनचा दोस्त असलेल्या मालदीवला लक्ष्य केलं आहे. मोदींनी मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांना मोठा झटका देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सोशल मीडियात आहे. थेट नाही, पण अप्रत्यक्षपणे हा मालदीव पर्यटनासाठी झटका ठरू शकतो.
मोदींचे फोटो पाहून अनेकांनी पुढील सुट्ट्यांमध्ये लक्षद्वीपला जाण्याची पसंती दर्शवली आहे. विदेशात न जाता आपल्याच देशातील पर्यटनाचा आनंद घेण्याचं बोलून दाखवलं. त्यामुळे, मालदीवमधील ट्रोल आर्मीने संताप व्यक्त केला आहे. आमच्यासोबत लक्षद्वीपची तुलना होऊच शकत नाही, असे तेथील नेटीझन्सने म्हटले आहे. @RazzanMDV नामक एका युजरने दोन्ही ठिकाणचे फोटो शेअर करत आमची आणि लक्षद्वीपची कुठलीही तुलना होऊ शकत नाही, असे म्हटले आहे. आम्ही शानदार रिसार्ट आणि लग्झरी टुरिझम देतो, असेही त्याने म्हटले. तर, मालदीव हे लक्षद्वीपपेक्षा अधिक पटीने स्टनिंग असल्याचंही एकाने म्हटलं आहे.