वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसने जगाला विळखा घातला आहे. जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगासमोर आव्हान उभं केलं असताना दुसरीकडे अवकाशातून आणखी नवं संकट पृथ्वीच्या दिशेने येत असल्याची माहिती समोर आली आहे. नासाने (NASA) याबाबत अलर्ट दिला आहे. 2020 या वर्षात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
हवामानातील बदल, कोरोना सारखी महामारी, चक्रीवादळ यासारख्या संकटांचा सामना केल्यानंतर आता वर्षाअखेरीस आणखी एक संकट पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. पृथ्वीच्या दिशेनं एक उल्का येत असल्याची माहिती नासाने दिली आहे. चिंताजनक बाब म्हणजे ही उल्का लहान नसून जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुबईच्या बुर्ज खलिफा एवढी मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उल्का 29 नोव्हेंबरला पृथ्वीच्या जवळून जाणार
नासानं दिलेल्या माहितीनुसार, 153201 2000 WO107 नावाची ही उल्का 29 नोव्हेंबरला पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. 90 हजार किमी ताशी वेगाने ही उल्का पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. या उल्केचा आकार सुमारे 820 मीटरच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. जगातली सर्वात मोठी इमारत असलेल्या बुर्ज खलिफाची उंची ही तब्बल 829 मीटर आहे. नासाने याबाबत अलर्ट केलं आहे.
उल्काचा आकार आणि वेग पाहता ही चिंतादायक बाब असली तरी पृथ्वीचे नुकसान होणार नाही
पृथ्वी आणि चंद्रामधील सरासरी अंतर 3 लाख 85 हजार किलोमीटर आहे, मात्र नासाने या अंतरातील सुमारे 20 पट श्रेणीत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करण्यास प्राधान्य दिले आहे. या उल्काचा आकार आणि वेग पाहता ही चिंतादायक बाब असली तरी पृथ्वीचे काही नुकसान होणार नाही. ही उल्का पृथ्वीवर येणार नाही, केवळ पृथ्वीच्या जवळून जाईल असं नासाने स्पष्ट केलं आहे. spacereference.org ने याबाबत माहिती दिली आहे.