ह्युस्टन : भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी झाले. त्यानंतर विक्रम लँडरशी संपर्क होण्याची इस्रोच्या शास्त्रज्ञांना असलेली आशा सुद्धा संपुष्टात येत आहे. मात्र, अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'च्या प्रयत्नाने विक्रम लँडरशी होण्याची आशा आहे. नासाने आपल्या चंद्रमा ऑर्बिटरद्वारे चंद्रावरील त्या भागातील फोटो टिपले, ज्या ठिकाणी विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला होता. नासा या फोटोंचा आढावा घेत आहे.
नासाच्या एका प्रोजेक्ट शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार मीडियाने यासंदर्भात माहिती दिली आहे. नासाच्या लूनर रिकॉनिसंस ऑर्बिटरने (LRO) चंद्राच्या अस्पृष्ट दक्षिण ध्रुवाजवळ जाताना अनेक फोटो टिपले आहे, ज्यावेळी विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला होता. एलआरओचे डेप्युटी प्रोजेक्ट शास्त्रज्ञ जॉन कॅलर यांनी नासाची माहिती शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी खुलासा केला आहे की, ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने फोटो घेतले आहेत.
सीनेट डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, LRO टीम या नवीन फोटोंचे विश्लेषण करणार आहे. विक्रम लँडर दिसत आहे का, हे आधीचे फोटो आणि आताचे फोटो पाहून विश्लेषण करणार आहे. ज्यावेळी विक्रम सॉफ्ट लँडिंग करत होते, त्यावेळी चंद्रावर संध्याकाळची वेळ होती, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान-2 योजनेवर साऱ्या जगाच्या नजरा होत्या. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच एखादे यान उतरणार होते. मात्र, पृष्ठभागापासून अवघ्या 2 किमीवर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने या योजनेला काहीसा धक्का बसला आहे. तरीही इस्त्रोच्या लढवय्या शास्त्रज्ञांनी यानाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
विक्रम 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार होते. मात्र, ते उलट्या भागावर कोसळल्याने संपर्क साधने कठीण बनले आहे. नासानेही विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र, मातीमध्ये अँटेना अडकल्याने हे प्रयत्न फोल ठरले आहेत. विक्रम लँडरला चंद्रावरील एक दिवस म्हणजेच पृथ्वीवरील 14 दिवसांसाठी काम करण्यासाठी बनविण्यात आले होते. यामुळे इस्त्रो आणि नासाकडे आता केवळ दोन दिवस उरले आहेत.