वॉशिंग्टन - अमेरिकन अंतराळ संस्था (नासा)ने एक अंतराळात अजून एक मोठी कामगिरी फत्ते केली आहे. नासानेपृथ्वीला वाचवण्यासाठीच्या अभ्यासांतर्गत आपल्या डार्ट मिशनला यशस्वीपणे पूर्णत्वास नेले आहे. सोमवारी अंतराळामध्ये २२५०० किमी प्रतितास वेगाने नासाचं अंतराळ यान अशनीवर(अॅस्ट्रॉईड) आदळलं. या प्रयोगाच्या माध्यमातून नासाला पृथ्वीवर येणाऱ्या अशनींची दिशा बदलता येणार की नाही, याबाबतची चाचपणी करायची होती.
ही चाचणी २७ सप्टेंबर रोजी सकाळी पावणे पाच वाजता सुरू झाली. त्यामध्ये डार्ट नामक नासाचं अंतराळ यान प्रति तास २२ हजार ५०० किमी वेगाने डिमॉरफोस लघुग्रहावर आदळलं. हा प्रयोग यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रयोगामुळे शास्त्रज्ञांना अशनीच्या कक्षा बदलण्याची आणि त्याच्या दिशेत बदल करण्याची अपेक्षा आहे.
नासाच्या मिशन कंट्रोलच्या एलेना अॅडम्स यांनी हा प्रयोग यशस्वी झाल्याची घोषणा केली. मात्र नासाचे अंतराळ यान अशनीवर आदळल्यानंतर ही अशनी कुठल्या दिशेने वळली आणि त्यामध्ये किती बदल झाला आहे. याबाबतची आकडेवारी समोर येण्यास काही वेळ लागणार आहे. कारण ही टक्कर झाल्यानंतर डार्टचा रेडियो सिग्नल बंद झाला होता.
अॅडम्स यांनी सांगितले की, जिथपर्यंत आम्ही तुम्हाला सांगू शकतो त्या अंदाजानुसार आमची पहिला ग्रह संरक्षण चाचणी म्हणजेच पृथ्वीला अॅस्ट्रॉईडपासून वाचवण्याची आमची चाचणी यशस्वी झाली आहे. मला वाटते आता लोकांना शांत झोपण्यास हरकत नाही, त्यांनी ही घोषणा करताच टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला.