Moon Mission Artemis-1: संपूर्ण जगाचे लक्ष लागले असलेली नासाची (NASA) चंद्र मोहीम त्याच्या दुसऱ्या प्रक्षेपणाच्या वेळी पुन्हा इंधन गळतीमुळे अपयशी ठरली आहे. शास्त्रज्ञांच्या लाखो प्रयत्नांनंतरही ही गळती थांबवण्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर नासाच्या अधिकाऱ्यांनी रॉकेट प्रक्षेपणाची वेळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पाच दिवसांपूर्वी इंधन गळतीमुळेच हे रॉकेट लाँच (Rocket Launch) नियोजित तारखेच्या पुढे ढकलण्यात आले होते. NASA चे हे महत्त्वाकांक्षी मिशन फ्लोरिडा येथील 'केनेडी स्पेस सेंटर'मधून प्रक्षेपित केले जाणार आहे.
मानवयुक्त मोहिमेअंतर्गत नासाचे हे पहिले रॉकेट आहे, जे फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून निघून चंद्राभोवती फिरून काही महत्त्वाची माहिती नासाला पाठवणार आहे. यामध्ये स्पेस लॉन्च सिस्टीम - एसएलएस ((Space Launch System- SLS) चा वापर केला जात आहे. त्याच्या यशानंतर, नासा आर्टेमिस-2 आणि आर्टेमिस-3 मोहिमांवर काम करणार असल्याची ही योजना आहे. आर्टेमिस 3 मिशन अंतर्गत, २०२४ पर्यंत, नासा ५० वर्षांनंतर पुन्हा चंद्रावर मानव पाठवेल. त्यामुळे Artemis-1 हे मिशन यशस्वी होणे खूप महत्वाचे आहे.
आर्टेमिस-1 मध्ये काय खास आहे?
युरोपियन स्पेस एजन्सी, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी या नासाच्या नेतृत्वाखालील या मोहिमेत सहभागी आहेत. आर्टेमिस-१ चे रॉकेट आणि ओरियन कॅप्सूल नासाच्या करारांतर्गत बोईंग कंपनी (Boeing Co-BA.N) आणि लॉकहीड मार्टिन कॉर्प (Lockheed Martin Corp -LMT.N) यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. मात्र इंधन गळतीमुळे आर्टेमिस-१ वर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. सध्या त्याचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे.