केप कॅनेव्हेरल (अमेरिका) : सूर्याच्या ‘कॉरोना’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतितप्त व अत्यंत अस्थिर अशा बाह्य वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने ‘पार्कर सोलर प्रोब’ या मानवरहीत यानाचे रविवारी केप कॅनेव्हेरल अंतराळ तळावरून यशस्वी प्रक्षेपण केले.युनायटेड लॉन्च अॅलायन्स या खासगी कंपनीने तयार केलेल्या ‘डेल्टा-४’ या अतिशक्तिशाली रॉकेटने या ‘सोलर प्रोब’ला कवेत घेऊन ठरल्या वेळी अचूक उड्डाण केले. शनिवारी ऐेन वेळी काही त्रुटी लक्षात आल्याने उड्डाण लांबणीवर टाकले होते. ताशी सुमारे सात लाख किमी अशा वेगाने प्रवास करत हे रॉकेट ‘पार्कर सोलर प्रोब’ला सूर्याच्या पृष्ठभागापासून ६.१६ दशलक्ष किमी अंतरावर वातावरणात नेऊन सोडेल. आजवर माणसाने पाठविलेली कोणताही वस्तू सूर्याच्या एवढ्या जवळ जाण्याची ही पहिलीच वेळ असेल.हे ‘सोलर प्रोब’ सूर्याच्या बाह्य वातावरणात पोहोचल्यावर पुढील सात वर्षे तेथे राहील. या काळात ते सूर्याच्या अधिकाधिक जवळ जात या ताºयाच्या सात प्रदक्षिणा करेल. अशी पहिली चक्कर येत्या नोव्हेंबरमध्ये अपेक्षित आहे. या संपूर्ण मोहिमेवर १.५ अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे. ‘नासा’च्या ‘लिव्हिंग विथ ए स्टार’ कार्यक्रमातील ही पहिलीच मोठी मोहीम.ही ‘हनुमान उडी’ कशासाठी?सूर्यावर एकसारखे महाप्रचंड स्फोट होतात. त्यातून अतिभारित चुंबकीय कणांची वादळे उठतात व ती संपूर्ण ग्रहमालेत पसरून पृथ्वीवरही पोहोचतात, असे मानले जाते. याचा परिणाम म्हणून पृथ्वीवरील दळणवळण साधने बंद पडतात व उष्णतेची लाट येते. ‘पार्कर सोलर प्रोब’ हे सर्व कसे, कशामुळे व किती कालावधीने होते याची वैज्ञानिक माहिती गोळा करेल.सूर्य म्हणजे नेमके काय आहे व तेथे कशा रासायनिक व आण्विक प्रक्रिया सुरू असतात, याचे अधिक सखोल ज्ञान यामुळे उपलब्ध होईल. सर्व चराचर सृष्टीचा सूर्य हाच तारणहार असल्याने त्याची अधिक खात्रीलायक ओळख होणे पृथ्वीवासीयांसाठी उपकारक असेल.डॉ. पार्कर यांना मिळाला हा विरळा बहुमानडॉ. युजेन न्यूमन पार्कर या थोर अमेरिकी सौरभौतिकी वैज्ञानिकाचे नाव या ‘सोलर प्रबोब’ला देण्यात आले आहे. वैज्ञानिकाच्या हयातीत त्याचे नाव ‘नासा’च्या एखाद्या मोहिमेस दिले जाण्याची ही पहिलीच वेळ. १९८३ मध्ये विल्यम ए. फाउलर यांच्यासोबत पदार्थ विज्ञानाचा ‘नोबेल’ पुरस्कार मिळालेल्या डॉ. चंद्रशेखर यांचाही ‘नासा’ने त्यांच्या क्ष-किरण वेधशाळेस ‘चंद्रा एक्स-रे आॅब्झर्व्हेटरी’ असे नाव देऊन मरणोत्तर गौरव केला आहे.1972मध्ये ‘हेलियॉस-२’ यानाने ४३ दशलक्ष किमी एवढ्या अंतरावरून सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास केला होता. म्हणूनच या मोहिमेला ‘सूर्याला स्पर्श करणारी मोहीम’ म्हटले गेले आहे. पृथ्वीपासून सूर्याचे अंतर १५० दशलक्ष किमी आहे.मोटारीच्या आकाराचे हे ‘सोलर प्रोब’ तीन मीटर लांबीचे व685किलो वजनाचे आहे.
नासाने घेतली सूर्याकडे झेप! ताशी ७ लाख किमी वेगाने करणार प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 6:46 AM