न्यूयॉर्क - दर महिन्यात एक दोन वेळा एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असल्याच्या बातम्या येत असतात. असे लघुग्रह बहुतांश वेळा पृथ्वीपासून दूरवरून किंवा अगदी जवळून निघून जातात. सध्याच्या काळात पृथ्वीवरीज जीवनाला सर्वाधिक धोका जर कुठल्या गोष्टीपासून असेल तर ती गोष्ट म्हणजे अंतराळातील लघुग्रह किंवा अशनींपासून आहे. जर कधी एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असेल आणि त्याची दिशा बदलली नाही तर प्रलय निश्चित असेल. त्यामुळे लघुग्रहांना पृथ्वीपासून दूर ठेवण्यासाठी किंवा त्यांच्या दिशेमध्ये बदल करण्यासाठी नासाने गेल्या वर्षी डार्ट मिशनची सुरुवात केली होती. आता पुढच्या महिन्यात २६ तारखेला हे मिशन लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणार आहे.
पृथ्वीला लघुग्रहाच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी हे अंतराळ यान दूर अंतराळात फिरत असलेल्या लघुग्रहाला धडक देणार आहे. अशा टक्करीमुळे लघुग्रहाच्या दिशेत बदल होऊ शकतो की नाही याचा अभ्यास करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. हे यान या लघुग्रहाला २३ हजार ७६० किमी प्रतितास वेगाने धडकणार आहे. त्यातून लघुग्रहाच्या दिशेत होणाऱ्या बदलाची नोंद घेतली जाईल. तसेच टक्करीमुळे लघुग्रहाची दिशा बदलणार की नाही हे पाहिले जाईल. तसेच टक्करीदरम्यान, लघुग्रहाच्या वातावरणातील धातू, धूळ, माती यांचाही अभ्यास केला जाईल.
या मोहिमेचं नामकरण डब्ल एस्टेरॉयड रीडायरेक्शन टेस्ट असं करण्यात आलं आहे. त्यासाठी ज्या तंत्राचा वापर केला जाणार आहे त्याला कायनेटिक इम्पॅक्टर टेक्निक म्हटले जाते. हे तंत्र यासाठी विकसिक केले आहे की ज्यामुळे पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या लघुग्रहांवर स्पेसक्राफ्ट आदळवून त्याच्या दिशेमध्ये बदल केला जाऊ शकेल. ज्या लघुग्रहावर नासा डार्ट स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून हल्ला करणार आहे त्याचं नाव डिडिमोस असं आहे.
डिडिमोस हा लघुग्रह २६०० फूट व्यासाचा आहे. याच्या चारही बाजूंनी फिरणारा एक छोटा चंद्रासारखा सुक्ष्म ग्रहही आहे. त्याचं नाव आहे डायमॉरफोस. यानाची टक्कर ही याच्याशीच होणार आहे. याचा व्यास ५२५ फूट आहे. नासा या छोट्या चंद्रासारख्या दगडाला लक्ष्य करेल. त्यानंतर दोघांच्या गतीमध्ये होणाऱ्या बदलाचे अध्ययन पृथ्वीवर असलेल्या टेलिस्कोपच्या माध्यमातून केले जाईल.