वॉशिंग्टन : नासाचे अभियंते नव्या पद्धतीचे ड्रोन विकसित करीत असून, हे ड्रोन रोव्हर जिथे पोहोचत नाहीत अशा चंद्र व मंगळावरील जागांचा शोध घेऊ शकतील. मंगळावरील खड्डे, लघुग्रह व चंद्रावरील न पोहोचलेल्या जागांचे नमुने हे ड्रोन घेऊन येतील, असे संशोधकांनी म्हटले आहे. उडती रोबोटिक वाहने, क्वाड कॉप्टरप्रमाणेच आहेत; पण ती विरळ हवामानातही तग धरू शकतील. मंगळाचे विरळ हवामान, लघुग्रहावरील हवाविरहित पोकळी व चंद्रावरील हवा यातही ते तग धरेल. हे ड्रोन यानाचा तळ बॅटरी व प्रॉपेलंट चार्ज करण्यासाठी वापरतील. हे भविष्यातील रोबो आहेत, असे वरिष्ठ तंत्रज्ञ रॉब म्युलर यांनी म्हटले आहे. फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमध्ये स्वॅम्प वर्कस्मध्ये ते काम करतात. मंगळ व लघुग्रहावर साठे असण्याचे ठिकाण शोधून काढणे हा पहिला टप्पा आहे, जिथे कायमच सावली वा अंधार असतो अशा ठिकाणी हे रोबो काम करतील. मंगळावरील खड्ड्याच्या काही भिंती ३० अंशात कललेल्या आहेत. अशा ठिकाणी सध्याचे रोव्हर जाऊ शकत नाहीत. नवी यंत्रणा एक्स्ट्रीम अॅक्सेस फ्लायर्स या नावाने विकसित केली जात आहे. त्यांची रचनाच अशी आहे की, कायम अंधार असलेल्या, खड्ड्यांच्या कोपऱ्यात हे रोबो काम करतील. तिथून ते मातीचा नमुना बाहेर काढतील. मंगळाच्या मातीत खरोखरच बर्फ आहे का? याचा शोधही यातून लागू शकेल. हे रोबो अगदी छोटे असतील, त्यामुळे यानात एकाच वेळी अनेक रोबो ठेवता येतील व पृष्ठभागावरही एकाच वेळी अनेक रोबो सोडले जातील. त्यामुळे एका रोबोचे काम बंद पडले तरीही काम थांबणार नाही. या ड्रोनचे काम कसे होते, ते पाहण्यासाठी पृथ्वीवरील कठीण जागांवर हे ड्रोन प्रथम सोडले जातील. स्वॅम्प वर्कस् या प्रयोगशाळेत असे अनेक डिझाईनचे रोबो वा ड्रोन तयार करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)
नासाचे ड्रोन चंद्र व मंगळावर संशोधन करणार
By admin | Published: August 09, 2015 10:12 PM