वॉशिंग्टन : नासाच्या एपिक कॅमेऱ्याने पृथ्वीपासून १६ लाख किलोमीटर अंतरावरून पृथ्वीची सूर्यप्रकाशाात उजळलेली छायाचित्रे घेतली असून ही अनोखी छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पृथ्वीला वाचविण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. डीप स्पेस क्लायमेट आॅब्झर्वेटरी या उपग्रहावर लावलेल्या नासाच्या अर्थ पॉलिक्रोमेटिक इमेजिंग कॅमेरा (एपिक) द्वारे १० वेगवेगळी छायाचित्रे एकत्र करून फोटोग्राफीच्या स्तरावर रंगीत छायाचित्र तयार केले आहे. ही छायाचित्रे अतिनील प्रकाशात घेण्यात आली असून त्यामुळे पृथ्वीचे विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीने करता येण्यासारखे आहे. नासाने ६ जुलै रोजी ही छायाचित्रे घेतली असून त्यात पृथ्वीवरील वाळवंटे, नद्यांचे प्रवाह व ढगांचा पॅटर्नही पाहता येतो. नासाने पाठविलेला निळ्या संगमरवराचे छायाचित्र पाहिले आणि हा ग्रह आपल्याला वाचवायचा आहे याची सुंदर स्मृती मनाने करून दिली. आपलाच हा ग्रह आपल्यालाच वाचवायचा आहे,असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
नासाच्या एपिक कॅमेऱ्याने घेतली पृथ्वीची दहा अनोखी छायाचित्रे
By admin | Published: July 21, 2015 10:32 PM