वॉशिंग्टन : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ २०१८ मध्ये आतापर्यंतच्या सर्वांत शक्तिशाली रॉकेटचे (अग्निबाण) प्रक्षेपण करणार आहे. हे रॉकेट मानवरहित अंतराळ यानासह १३ छोट्या उपग्रहांना (क्युब सॅटस्)सोबत नेणार असून, त्यामुळे अंतराळातील सजीवसृष्टीचा शोध घेण्यासाठीच्या भावी मोहिमांचा मार्ग प्रशस्त होईल. स्पेस लाँच सिस्टम (एसएलएस) हे नासाने तयार केलेले आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली रॉकेट असून, ते १३ छोट्या उपग्रहांसह २०१८ मध्ये पहिले उड्डाण घेईल. त्याचबरोबर ते एक मानवरहित यानही सोबत नेणार आहे. एसएलएसच्या पहिल्या उड्डाणाचे एक्सप्लोरेशन मिशन १ (ईएम १) असे नामकरण करण्यात आले असून, या मोहिमेत अंतराळात दूरपर्यंत जाण्यासाठी छोटे-छोटे प्रयोग करता येणार आहेत. १३ छोट्या उपग्रहांपैकी ‘निअर अर्थ अॅस्ट्रोईड स्काऊट’ किंवा ‘एनईए स्काऊट’ हा उपग्रह एका धूमकेतूचा अभ्यास करील, त्याची छायाचित्रे घेईल, तसेच अंतराळातील त्याच्या स्थितीची माहिती गोळा करील. बायो सेंटीनल क्यूब सेट पाचकद्रव्याद्वारे खोल अंतराळात दीर्घ काळापर्यंत जिवंत जीवावरील किरणोत्सर्गाचा शोध घेईल, तसेच त्याचे मोजमाप करण्यासह त्याच्या परिणामांचीही तुलना करील. छोटे उपग्रह बूट ठेवण्याच्या बॉक्सएवढ्या आकाराचे असतात. मोठ्या उपग्रहांच्या प्रक्षेपणांवर प्रचंड खर्च होतो. त्या तुलनेत छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणावर फारसा खर्च होत नाही. (वृत्तसंस्था)
नासा करणार सर्वात शक्तिशाली रॉकेटचे २०१८ मध्ये प्रक्षेपण
By admin | Published: February 04, 2016 3:05 AM