वॉशिंग्टन : गोपनीय कागदपत्रे प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ३७ आरोप जाहीर करण्यात आले. यांपैकी ३१ आरोप हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कागदपत्रे जाणूनबुजून बाळगल्याबद्दल आहेत. याशिवाय खोटी विधाने करणे, कागदपत्रे स्वत:जवळ असल्याची बाब लपवणे आणि तपासात अडथळा आणणे यांसारखे आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
ट्रम्प यांनी ही कागदपत्रे त्यांच्या बाथरूम, बॉलरूम, शॉवर स्पेस, ऑफिस, स्टोअर रूम आणि बेडरूममध्ये लपवली होती, असे ४९ पानांच्या आरोपपत्रात म्हटले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या वकिलांना फायली लपविण्याचे किंवा नष्ट करण्याचे आदेश दिले होते, असेही सरकारी वकिलांनी सांगितले. अमेरिकेच्या न्याय विभागाने ट्रम्प यांच्या घरातून जप्त केलेल्या कागदपत्रांची अनेक छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
२१ टॉप सिक्रेट, ९ सिक्रेट
आरोपपत्रानुसार, गेल्या वर्षी एफबीआयने ट्रम्प यांच्याकडून ३३७ सरकारी फाइली जप्त केल्या होत्या. यांतील २१ फायलीवर टॉप सिक्रेट लिहिले होते. ही अशी कागदपत्रे आहेत, ज्यांत अत्यंत संवेदनशील माहिती असते. फक्त काही मर्यादित लोकांनाच ती उपलब्ध असतात.
नेमक्या फाइल्स कशा संबंधित होत्या?
फाइलमध्ये इतर देशांच्या आण्विक क्षमतेबद्दल गुप्तचर माहिती होती. फाइलींमध्ये अमेरिकेचा आण्विक कार्यक्रम आणि अमेरिका, इतर देशांच्या संरक्षण व शस्त्रास्त्र क्षमतांशी संबंधित तपशील आहेत. फाइल्समध्ये युद्धक्षेत्रात अमेरिका व तिच्या मित्रराष्ट्रांचे कच्चे दुवे काय आहेत, हे सांगितले होते.
स्पेशल कौन्सिल जॅक स्मिथ हे वेडे, ट्रम्पद्वेषी आणि ठग आहेत. अशा वेड्या माणसाला न्यायाशी संबंधित कोणत्याही कामाची जबाबदारी नको. -डोनाल्ड ट्रम्प
देशात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित काही कायदे आहेत, जे सर्वांना लागू होतात. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, असे कृत्य कोणी केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. - जॅक स्मिथ