पॅरिस : एकीकडे जागतिक पातळीवरील अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात झालेली असताना दुसरीकडे मात्र कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. फ्रान्समध्ये कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा देशव्यापी कर्फ्यू लावण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत फ्रान्समध्ये २६ हजार ७८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यानंतर देशव्यापी कर्फ्यू लावण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत फ्रान्समधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या सर्वाधिक आहे. गेल्या २४ तासांत फ्रान्समध्ये ३१० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. २८ नोव्हेंबर २०२० रोजी एकाच दिवशी फ्रान्समध्ये सर्वाधिक २८ हजार ३९३ कोरोना रुग्ण आढळून आले होते.
फ्रान्स सरकारचे प्रवक्ते गॅब्रिएल अट्टल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशव्यापी कर्फ्यू हा प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आला आहे. सकारात्मक परिणाम आल्यानंतर पुढील आदेश जारी करेपर्यंत हा लागू राहील. फ्रान्समध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच फ्रान्समध्ये आल्यानंतर त्यांना सात दिवस क्वॉरंटाइन राहावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
एका अहवालानुसार, जागतिक स्तरावर आतापर्यंत ९ कोटी ७४ लाख कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७ कोटी १५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २० लाख ८६ हजारांवर पोहोचली आहे. तर, उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या २.५३ कोटी आहे.