सॅन फ्रान्सिस्को : नाताळ सणानिमित्तच्या पार्टीवर महिलेसह दोन जणांनी गुरुवारी केलेल्या गोळीबारात १४ जण ठार, तर १७ जण जखमी झाले. कॅलिफोर्नियातील सॅन बर्नार्दिनोतील इनलँड रिजनल या अपंगांसाठीच्या केंद्रावर सुरू असलेल्या या पार्टीला सुमारे ५०० जण उपस्थित होते. हल्लेखोर हे मूळ पाकिस्तानी जोडपे होते व त्यांच्याकडे आॅटोमॅटिक अॅसॉल्ट रायफल होती. गावातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पार्टी सुरू होती तेव्हा गोळीबार झाला. फारुक आणि मलिक यांचे लग्न झाले होते व त्यांना सहा महिन्यांची मुलगी आहे, असे फारुकचे सासरे फरहान खान यांनी सांगितले. फारुकचा जन्म अमेरिकेतील असून, तो अमेरिकेचा नागरिक होता. तो पर्यावरणतज्ज्ञ म्हणून गावातील आरोग्य विभागात काम करायचा. त्याने पूर्वी कधी तरी इनलँड रिजनल सेंटरमध्येही काम केले होते. फारुक या पार्टीमध्ये होता व तेथे वाद झाल्यानंतर तो संतापून निघून गेल्याचे बुर्गुअन यांनी सांगितले. नंतर तो आणि त्याची पत्नी स्फोटक साहित्य, अॅसॉल्ट रायफल्स आणि हँडगन्ससह आले. हल्ल्यांच्या वेळी वापरतात असा त्यांचा पोशाख होता. त्यांचा काय हेतू होता हे सांगता येणार नाही; परंतु दहशतवादी कृत्याची शक्यताही फेटाळून लावता येणार नसल्याचे ते म्हणाले.हे दोघे एवढे ‘तयार’ कसे होते. ही घटना घडली त्यावरून काही प्रमाणात तरी त्यांनी त्याची आखणी केली असावी. मला नाही वाटत की, ते घरी गेले आणि ते कपडे घातले, बंदुका घेतल्या आणि परत येऊन गोळीबार केला. (वृत्तसंस्था)