वॉशिंग्टन : जगातील सर्वात प्रगत, शक्तिशाली व बहुद्देशीय अशी २४ एमएच-६० ‘रोमियो’ सीहॉक हेलिकॉप्टर भारतास विकण्यास अमेरिका सरकारने मंजुरी दिली आहे. ही हेलिकॉप्टर भारतीय नौदलात दाखल झाल्यावर हिंदी महासागरातील चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी ती अत्यंत उपयुक्त ठरतील, असे मानले जाते.
लॉकहीड मार्टिन कंपनीची ही हेलिकॉप्टर विकत घेण्याचा सौदा सुमारे २.४ अब्ज डॉलरचा असेल. भारतीय सागरी हद्दीत वावरणाऱ्या पाणबुड्या शोधून त्यांचा अचूक वेध घेऊ शकणाऱ्या प्रबळ ‘हंटर’ हेलिकॉप्टरची भारतीय नौदलास गेल्या एक दशकाहून काळ भासणारी निकड या हेलिकॉप्टरने पूर्ण होईल. सध्या नौदलाकडे यासाठी ब्रिटनकडून घेतलेल्या ‘सी किंग हेलिकॉप्टरचा ताफा आहे; परंतु ती जुनी झाल्याने त्यांची जागा आता ही नवी ‘सीहॉक’ हेलिकॉप्टर घेतील. या हेलिकॉप्टर विक्रीच्या सौद्यास मंजुरी देण्यात आल्याचे ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी काँग्रेसला अधिकृतपणे कळविले. इंडो-पॅसिफिक आणि दक्षिण आशिया क्षेत्रातील राजकीय स्थैर्य, शांतता व आर्थिक विकास सुनिश्चित करण्याच्या अमेरिकेच्या धोरणात महत्त्वाचा भागीदार असलेल्या भारताच्या सुरक्षेस या सौद्यामुळे बळकटी मिळेल, असे अमेरिकी सरकारने नमूद केले. भारत या नव्या साधनाचा वापर स्वसंरक्षणासोबतच क्षेत्रीय धोक्यांना तोंड देण्यासाठी करेल, अशी ग्वाहीही ट्रम्प प्रशासनाने संसदेस दिली. (वृत्तसंस्था)रांगडी बहुद्देशीय क्षमताएमएच-६० ‘रोमियो’ सीहॉक हेलिकॉप्टर त्यांच्या रांगड्या बहुद्देशीय क्षमतेबद्दल नावाजलेली आहेत. अमेरिकाही त्यांच्या नौदलात या हेलिकॉप्टरचा एक प्रमुख शस्त्र-आयुध म्हणून वापर करते. सागराच्या पृष्ठभागावरील किंवा पाण्याखालील कोणत्याही संभाव्य धोक्याचा तात्काळ प्रतिकार करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. त्याखेरीज नौदलाच्या अन्य जहाजांना हवेतल्या हवेत राहून रसद पुरविणे, अडचणीत असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना वाचविणे व संदेशवहन ही अन्य कामे करण्यात ही हेलिकॉप्टर वाक्बगार आहेत. फ्रिगेट, विनाशिका, संहारक नौका व विमानवाहू युद्धनौका यासारख्या नौदलातील नानाविध चल तळांवरून सीहॉक सफाईदारपणे वापरता येतात.