इस्लामाबाद, दि. 28 - बहुचर्चित पनामागेटप्रकरणी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. नवाज शरीफ यांना पंतप्रधान पदावरुनही हटवण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानात राजकीय भूकंपच आला आहे. पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी न्यायालयाने नवाज शरीफ यांना दोषी ठरवलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर नवाज शरीफ पंतप्रधानपदावरुन पायउतार झाले आहेत.
पनामा पेपर्स घोटाळा प्रकरणी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी काही दिवसांपुर्वी संपली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखीव ठेवला होता. यावेळी अनेक राजकीय विश्लेषकांनी न्यायालयाचा निर्णय नवाज शरीफ यांच्याविरोधात जाईल असा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे न्यायालयाने नवाज शरीफ यांच्याविरोधात निर्णय दिला असून त्यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आणली आहे.
Pakistan Prime Minister #NawazSharif disqualified by Supreme Court in #Panamagate graft case verdict.
— Press Trust of India (@PTI_News) July 28, 2017
Panama case verdict: Scenes outside Supreme Court of Pakistan after Nawaz Sharif's disqualification as PM. pic.twitter.com/HLgcBkIF8a
— ANI (@ANI_news) July 28, 2017
तीन सदस्यीय खंडपीठासमोर संपुर्ण सुनावणी पार पडली होती. न्यायाधीश एजाज अफजल यांच्या अध्यतेखालील खंडपीठात शेख अजमत सईद आणि इजाजूल एहसान यांचा समावेश होता. सुनावणी पुर्ण झाल्यानंतर निकालासाठी कोणतीही तारीख त्यांनी जाहीर करण्यात आली नव्हती. निकाल देत असताना कोणत्याही कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं न्यायाधीस सईद यांनी यावेळी सांगितलं होतं. सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपास पथकाने सादर केलेल्या अंतिम अहवालावरही चर्चा करण्यात आली होती.
Supreme Court orders National Accountability Bureau to file case against #NawazSharif and his children in 6 weeks; #Panamagate.
— Press Trust of India (@PTI_News) July 28, 2017
पनामा पेपर्स लीक प्रकरणात 1990च्या दशकात शरीफ यांनी लंडनमध्ये घर खरेदी केल्यानंतर उघडकीस आलं होतं. शरीफ यांनी त्यावेळी दोनदा पाकिस्तानचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. पनामा प्रकरण हे नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलांशी संबंधित आहे. त्यामुळे सत्तारूढ असलेल्या पीएमएल-एन पार्टीमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत.
नवाज शरीफ यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांची तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयान सहा सदस्यांची संयुक्त तपास पथक गठीत केलं होतं. या टीमने 60 दिवसांचा आपला तपासणी अहवाल 10 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. तपास पथकाने दिलेल्या अहवालात पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासहित त्यांची मुलं हसन नवाज, हुसेन नवाज आणि मुलगी मरयम नवाजविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी शिफारस केली होती.
तपास पथकाने अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने त्याच्या प्रती सर्व पक्षांना देत न्यायालयात येण्याआधी वकिलांना तयारी करुन येण्याचा आदेश दिला होता. नवाज शरीफ सरकारने मात्र हा अहवाल नाकारला असून षडयंत्र असल्याचा आरोप केला होता.
काय आहे पनामागेट प्रकरण?
श्रीमंत व धनाढ्य नागरिक स्वत:ची संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे टॅक्स चोरतात? काय क्लुप्त्या लढवतात, यासंबंधीची माहिती अत्यंत गोपनीयतेने काम करणा-या पनामाच्या मोसेक फोन्सेका कंपनीची महत्वपूर्ण व गोपनीय कागदपत्रे लीक झाल्याने समोर आली होती. या यादीत जगभरातील अनेक महत्वपूर्ण , धनाढ्य व्यक्ती,उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकारण्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत ५०० भारतीयांचीही नावेदेखील आहेत.
मोसेक फोन्सेका आपल्या ग्राहकांना काळा पैसा सफेद करण्यासाठी तसंच नियमांमधून वाचवण्यासाठी आणि करातून सूट मिळावी यासाठी कशा प्रकारे मदत करायची ही माहिती या कागदपत्रांमधून समोर आली होती.
ही कागदपत्रे लीक झाल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, सीरियामधील राष्ट्राध्यक्ष बशर अल असद, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांनीदेखील संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे पनामाची मदत घेतली ही माहिती समोर आली होती. एकीकडे जगभरातील इतकी मोठे नावे समोर आली असताना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचं नावदेखील समोर आलं होते. ब्लादिमीर पुतिन यांनी जवळच्या मित्रांची मदत करण्यासाठी पनामाचा वापर केल्याची माहिती उघड झाली होती. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनोल मेस्सीचादेखील यामध्ये समावेश आहे.