इस्लामाबाद: नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असणारे पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ(Nawaz Sharif) यांच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. 2008 मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर नवाझ शरीफ यांनी भारताला मदत केली होती, त्यावेळी त्यांनीच अजमल कसाबच्या ठिकाणाची माहिती भारताला दिली, असा मोठा खुलासा रशीद यांनी केला आहे.
शेख रशीद एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले की, 'नवाझ शरीफ हे अशा नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी पैशासाठी आपला विवेक विकला, पाकिस्तानची इज्जत धुळीत मिळवली. त्यांनी सद्दाम हुसेन, मुअम्मर गद्दाफी आणि ओसामा बिन लादेनसारख्या लोकांकडून आर्थिक मदत घेतली.' रशीद हे पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री असून, ते पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळचे मानले जातात. रशीद यांनी नवाझ शरीफबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अनेक तर्क लावले जात आहेत.
शरीफ यांचे शाहबाज पंतप्रधान पदाचे दावेदार आहेतसध्या पाकिस्तानातील संपूर्ण विरोधक पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात एकवटले आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ या दोन विरोधी पक्षांनीही एकमेकांशी हातमिळवणी केली आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व नवाझ शरीफ यांचे भाऊ शाहबाज करत आहेत. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधी पक्षांनी मिळून इम्रान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे, यावर 31 मार्चला चर्चा होणार आहे. हा अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यास किंवा या मतदानापूर्वी इम्रान खान यांनी राजीनामा दिल्यास त्यांच्या जागी शाहबाज यांना पंतप्रधानपद मिळू शकते, असे बोलले जात आहे.