पाकच्या पंतप्रधानांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेशलाहोर : विरोधकांच्या आंदोलनांनी आधीच त्रस्त असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासमोरील अडचणीत आणखी भर पडली आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ, त्यांचे भाऊ आणि पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज यांच्यासह १९ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश एका न्यायालयाने दिला आहे. कॅनडास्थित धर्मगुरू तहीरूल कादरी यांच्या मुख्यालयाजवळ मागील जून महिन्यात पोलीस गोळीबारात १४ जण ठार झाले होते. त्यासंबंधी हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याने शरीफ गोत्यात अडकले आहेत. पाकिस्तान अवामी तहरिक (पीएटी)ने दाखल केलेल्या तक्र्रारीत आरोपी म्हणून २१ जणांची नावे दिली असून, त्यावरूनच खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश लाहोर सत्र न्यायालयाने दिले आहेत. पीएटीचे प्रमुख कादरी आणि पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांच्या आंदोलनाने राजधानी ढवळून निघालेली असतानाच न्यायालयाने हा आदेश दिला आहे. नवाझ शरीफ सरकारने राजीनामा देईपर्यंत आपण राजधानी सोडणार नाहीत, असा इशारा या दोन्ही नेत्यांनी दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजा अजमल यांनी शनिवारी नवाझ यांचे पुतणे हमजा शाहबाज, गृहमंत्री चौधरी निसार अली खान आणि इतरांवरही खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी, हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या एक सदस्यीय न्यायालयीन आयोगाने प्रांत सरकारला या घटनेसाठी जबाबदार धरले होते; परंतु विरोधकांनी हा अहवाल फेटाळला आहे. शरीफ बंधू सत्तेबाहेर जाताच पुन्हा या घटनेची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी प्राप्त परिस्थितीबाबत आपले बंधू शाहबाज यांच्याशी आपल्या निवासस्थानी सविस्तर चर्चा केली. सत्र न्यायालयाच्या आदेशाला पंजाब प्रांताचे सरकार लाहोर उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे, अशी माहिती पीएमएल-एन पक्षाच्या एका नेत्याने दिली. कादरी यांनी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले आहे.
नवाज शरीफ आणखी अडचणीत
By admin | Published: August 16, 2014 10:24 PM