इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ ब्रिटनमधील चार वर्षांच्या विजनवासानंतर शनिवारी विशेष विमानाने मायदेशी परतले. आगामी सार्वत्रिक निवडणुकांत आपल्या पक्षाचे नेतृत्व करून विक्रमी चौथ्यांदा विजय मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पाकमध्ये जानेवारीत निवडणूक होणार आहे.
शरीफ दुबईहून ‘उमीद-ए-पाकिस्तान’ या चार्टर्ड विमानाने दुपारी इस्लामाबाद येताच विधी पथकाने त्यांची भेट घेतली. न्यायालयाने मंजूर केलेल्या जामीन प्रक्रियेचा भाग म्हणून उच्च न्यायालयात सादर करावयाच्या काही कायदेशीर कागदपत्रांवर त्यांची स्वाक्षरी घेतली. (वृत्तसंस्था)
विमानतळावर म्हणाले, आज मी आनंदी
दुबई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शरीफ यांनी पाकमधील ‘अत्यंत अराजक’ परिस्थितीबद्दल दु:ख व्यक्त केले व संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी आपला पक्ष सक्षम असल्याचे सांगितले. शरीफ म्हणाले, ‘जेव्हा मी पाकिस्तान सोडून परदेशात जात होतो तेव्हा मनात आनंदाची भावना नव्हती; पण आज मी आनंदी आहे. २०१७ नंतर देशाची परिस्थिती बिघडत गेली. तेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा निरोप घेतला होता, वीज स्वस्त होती. गरीब कुटुंबातील मुलगा शाळेत जात होता आणि औषधेदेखील स्वस्त होती.