नैरोबी : युद्धग्रस्त दक्षिण सुदानमध्ये तब्बल ३०,००० नागरिक कुपोषणामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत, असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर भीषण दुष्काळामुळे आणखी हजारो नागरिक याच मार्गावर आहेत, असेही म्हटले आहे.युद्धग्रस्त भागात अधिकृतरीत्या दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नसला तरी मागील २२ महिन्यांतील ही अत्यंत वाईट स्थिती आहे, असेही संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. युद्धाच्या स्थितीमुळे युद्धगुन्हे व इतर अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अन्नधान्य पुरवठाही खंडित करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न व कृषी संघटना, युनिसेफ व जागतिक अन्न कार्यक्रम यांनी संयुक्त अहवाल जारी करून या स्थितीची माहिती दिली आहे. युद्धस्थितीमुळे ज्या भागांना फटका बसला आहे, त्यात तेलाचे उत्पादन करण्यात अग्रेसर असलेल्या भागाचाही समावेश आहे; परंतु आता येथे सुरू असलेल्या जोरदार युद्धामुळे महिला व मुलांचे सामूहिक अपहरण, बलात्कार अशा घटना वाढल्या आहेत. यामुळे एकूण ३९ लाख लोक प्रभावित झाले असून ही लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश एवढी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आणखी ८० टक्के जास्त लोक प्रभावित झाले आहेत. एकूण लोकसंख्येच्या २० टक्के नागरिक जेव्हा भूकबळीच्या उंबरठ्यावर उभे असतात तेव्हा भीषण स्थितीचा इशारा दिला जातो. तेथील नागरिकांची व्यक्तिगत स्थितीही अत्यंत भीषण झाली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. युद्धजन्य भागात फारच कमी पाऊस झाल्यामुळे पीकस्थिती गंभीर आहे. तरीही दुष्काळाची स्थिती उद्भवण्यास हवामान नव्हे तर युद्धस्थिती कारणीभूत आहे, असे अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)अनेक भागांतील मदतकार्य बंद केलेलीर, गीट, कोच आणि मेंडिट या भागात मदतकार्य सुरू होते; परंतु जोरदार युद्ध सुरू असल्यामुळे हे मदतकार्य बंद करावे लागले. या भागातील दोन्ही बाजूंचे लोक वंशवादामुळे क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडत आहेत. आपल्या शत्रू समजल्या जाणाऱ्या वंशाची मुले, स्त्रिया यांची हत्या, छळ, अपहरण केले जात आहे. दुष्काळ जाहीर करणे ही फक्त एक तांत्रिक बाब आहे. येथे तातडीने मानवी मदत पोहोचली नाही तर स्थिती भीषण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
दक्षिण सुदानमध्ये ३०,००० नागरिक कुपोषणामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर
By admin | Published: October 23, 2015 3:50 AM