संयुक्त राष्ट्र : जगभरातील व्यापक संघर्ष, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध भारतीय शिक्षणतज्ज्ञ जगदीश गांधी यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचा सल्ला दिला आहे. बालकाचा दृष्टिकोन संकुचित राष्ट्रवादापासून व्यापक जगवादामध्ये परावर्तित होण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करणे अपरिहार्य असल्याचे ते म्हणाले. गांधी येथे सुरू असलेल्या ६५ व्या संयुक्त राष्ट्र डीपीआय-एनजीओ परिषदेत सहभागी होण्यासाठी आले आहेत. लोक जात, वंश व धर्माच्या नावावर लढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुलांना लहान वयातच इतर धर्म व श्रद्धांचा आदर करायला शिकवणे आवश्यक आहे. जग बदलत असल्याच्या दृष्टिकोनातून २१ व्या शतकातील शिक्षणाचा गाभा २० व्या शतकापासून वेगळा असणे गरजेचे आहे, असे गांधी यांनी सांगितले. गांधी लखनौतील सिटी मॉन्टेसरी स्कूलचे संस्थापक आहेत. (वृत्तसंस्था)