नवी दिल्ली/ काठमांडू : कैलास मानसरोवर यात्रेवर निघालेले 1500हून अधिक भारतीय नागरिक मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये अडकले आहेत. नेपाळमधील भारतीय दूतावासाने जाहीर केलेल्या यात्रेकरूंच्या यादीनुसार, भारतातून गेलेले 525 यात्रेकरू सिमीकोट इथे, 550 हिल्सा इथे तर तिबेटच्या मार्गावर 500 यात्रेकरू अडकले आहेत.
नेपालगंज, सिमीकोट आणि हिल्सा या भागातील परिस्थितीवर भारतीय दूतावास लक्ष ठेवून आहे. मंगळवारी सकाळी वातावरण खराब झाले होते. नेपाळमध्ये भारतीय दूतावासाने यात्रेकरू व त्यांच्या नातेवाईकांसाठी विविध भाषांमधून हॉटलाईन सेवा सुरू केली आहे. तसेच नेपाळमध्ये नागरिक व वैद्यकीय सेवा पुरेशा नसल्याने यात्रेकरूंना तिबेटमध्येच थांबण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.