नेपाळमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने लोकांना हादरवून सोडले आहे. लँडिंगच्या अवघ्या १० सेकंदापूर्वी कोसळलेल्या विमानात ६८ प्रवाशी आणि ४ क्रू मेंबर्ससह एकूण ७२ जण होते. या विमान अपघातात एअर होस्टेस ओसीन आले हिचाही मृत्यू झाला आहे. टिकटॉकवरील तिचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. विमानाच्या आत त्याने हा व्हिडीओ तयार केला होता. विमानात हसत हसत व्हिडीओ बनवणाऱ्या ओसीन आलेने कधीच विचार केला नसेल की असा एक दिवस येईल की आपल्याला याच विमान अपघातात या जगाचा निरोप घ्यावा लागेल. या व्हिडीओमध्ये ती विमानात एकटी दिसत आहे.
रविवारी काठमांडूपासून २०५ किमी अंतरावर असलेल्या पोखरामध्ये यति एअरलाइन्सचे ७२ आसनी विमान कोसळले. लँडिंगच्या अवघ्या १० सेकंद आधी विमान एका टेकडीवर आदळले, त्यानंतर विमानाला आग लागली.
गायिकेचाही मृत्यूया अपघातात नेपाळच्या परिचित गायिका नीरा छन्त्याल यांचाही मृत्यू झाला. पोखरा येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या विमानाने प्रवास करत होत्या. नीरा यांची गाणी लोकांच्या पसंतीसही उतरली होती.
काय असू शकतात कारणं?नेपाळला जाणार्या प्रमुख भारतीय एअरलाइन्समधील पायलटने सांगितले की, पायलटच्या थकव्यासह अपघाताची अनेक कारणे असू शकतात. त्यांनी सांगितलं की, विमान उडवताना प्रत्येक टप्प्यावर निर्णय घ्यावे लागतात आणि पायलटला चांगली विश्रांती आवश्यकता असते. त्यामुळे, पायलटच्या थकव्यामुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. एटीआर विमानाच्या पायलटने सांगितले की, अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड किंवा पायलटची चूक असू शकते. मात्र, हे तपासानंतरच स्पष्ट होईल. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24 ने सांगितले की, हे विमान १५ वर्षे जुने ATR 72-500 आहे. त्याचा नोंदणी क्रमांक 9N-ANC आहे आणि अनुक्रमांक ७५४ असा होता.
३० वर्षांत २७ अपघातनेपाळमध्ये गेल्या ३० वर्षांमध्ये २७ प्राणघातक विमान अपघात झाले. १९९२ मध्ये दोन मोठे विमान अपघात झाले होते. जुलै महिन्यात थाई एअरलाईन्सच्या विमानाला झालेल्या अपघातात ११३ जणांचा मृत्यू झाला तर सप्टेंबरमध्ये पाकिस्तान एअरलाईन्सचे विमान कोसळून त्यात सर्व १६७ जणांचा मृत्यू झाला होता.