नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७२ आसनी प्रवासी विमान रन वेवर अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या बचावकार्यला सुरूवात करण्यात आली असून विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती समोर आलीये. यति एअरलाईन्सनंही या वृत्ताला दुजोरा देत अधिक माहिती दिली आहे.
जुनं विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण ६८ प्रवासी प्रवास करत होते. तसंच यात चार क्रू मेंबर्सदेखील होते, अशी माहिती यति एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन बरतौला यांनी दिली सोशल मीडियाद्वारे समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओनुसार अपघातग्रस्त विमानातून धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहे. हेलिकॉप्टरद्वारे बचाव पथकही रवाना करण्यात आलेय. प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान एका टेकडीवर आदळले. यानंतर त्यात स्फोट होऊन आग लागली. आगीमुळे लोकांना बाहेर काढण्याच्या कामात अडचणी येत आहेत. अपघाताचे ठिकाण नदीजवळ असल्याचे सांगण्यात येत आहे.तीन दशकांत सात विमान अपघातपोखरा येथे झालेल्या विमान अपघातानंतर त्यासंबंधीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये विमान अपघातानंतर धुराचे लोट स्पष्टपणे दिसून येतात. विशेष म्हणजे नेपाळचे पोखरा विमानतळ अपघातांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जात होते. यापूर्वी येथे अनेक विमान अपघात झाले आहेत. आकडेवारीबाबत सांगायचे झाले तर गेल्या ३० वर्षांत पोखर-जोमसुम मार्गावर सात विमानांचे अपघात झाले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यातच तारा एअरलाइन्सचे विमान कोसळले होते, ज्या अपघातात क्रू मेंबर्ससह सर्व २२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.