Nepal Aircraft Crash : नेपाळमधील पोखरा येथे रविवारी एक विमान अपघात झाला. यति एअरलाईन्सचे विमान लँडिंगच्या १० सेकंद आधी क्रॅश झाले. या दुर्घटनेतील आतापर्यंत ६९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. विमानात ६८ प्रवाशांसह ४ क्रू मेंबर्सदेखील होते. विमान अपघातात ५ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. त्यात उत्तर प्रदेशातील गाझीपूरच्या ४ मित्रांचाही समावेश आहे. चौघंही जण तीन दिवसांपूर्वीच नेपाळ फिरण्यासाठी आले होते.
पोखरामध्ये मृतदेह सापडल्यानंतर त्यांची ओळख पटू शकली, त्यानंतर गाझीपूर प्रशासनाने गावात जाऊन याची खातरजमा केली. ज्या चार जणांचा मृत्यू झाला त्यांच्यापैकी एकाच्या भावाने या घटनेचा व्हिडीओ त्याच्या फेसबुकवर लाइव्ह पाहिल्याचे सांगितले जात आहे. नेपाळमधील चार तरुणांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर गाझीपूरमधील त्यांच्या घरावर शोककळा पसरली आहे. रविवारी काठमांडूपासून २०५ किमी अंतरावर असलेल्या पोखरामध्ये यति एअरलाइन्सचे ७२ आसनी विमान कोसळले. लँडिंगच्या अवघ्या १० सेकंद आधी विमान एका टेकडीवर आदळले, त्यानंतर विमानाला आग लागली. नेपाळ प्रशासनाने सोनू जैस्वाल, अभिषेक कुशवाह, अनिल कुमार राजभर आणि विशाल शर्मा हे गाझीपूरमधील बरेसर अलावलपूर येथील रहिवासी विमानात होते याची ओळख पटवली आहे. अपघातापूर्वी हे चौघेही फेसबुकवर लाईव्ह होते. त्याचा हा व्हिडीओ फेसबुकवर समोर आला आहे. सोनू जयस्वाल लाइव्ह करत होता. यामध्ये आतील आणि बाहेरील दृश्ये दाखवत असताना विमान कोसळले आणि आगीच्या ज्वालाही व्हिडीओत दिसू लागल्या.गेल्या महिन्यात नेपाळचा प्लॅनसोनू जयस्वालसह चार मित्र अनेक दिवसांपासून बाहेर फिरण्यासाठी जाण्याच्या तयारीत होते, सर्वांनी मिळून गेल्या महिन्यातच नेपाळला जाण्याचा प्लॅन बनवला होता. १३ जानेवारी रोजी चार मित्र कारने मऊ येथे गेले आणि नंतर बसने काठमांडूला पोहोचले. रविवारी काठमांडूहून पोखराला जात असताना विमानाचा अपघात झाला. त्यातच गाझीपूर येथील चार मृतांच्या माहितीवरून येथील प्रशासनात खळबळ उडाली आहे. घाईघाईत पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी गावात पोहोचले आणि त्यांनी गावकऱ्यांकडून माहिती घेतली. कासीमाबादचे एसडीएम आणि तहसीलदार यांनी मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.