Nepal Airplane Crash : नेपाळमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताने लोकांना हादरवून सोडले आहे. लँडिंगच्या अवघ्या १० सेकंदापूर्वी कोसळलेल्या विमानात ६८ प्रवाशी आणि ४ क्रू मेंबर्ससह एकूण ७२ जण होते. परंतु यानंतर नेपाळमध्ये हवाई सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. दरम्यान, यति एअरलाईन्स आणि तारा एअरची विमाने आणि त्याच्या उड्डाणांबाबत कंपनीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आणखी एक गोष्ट समोर आली आहे. खुद्द यति एअरलाइन्सच्या मालकाचाही अशाच विमान अपघातात मृत्यू झाला. ही घटना फेब्रुवारी २०१९ रोजी घडली होती. नेपाळचे तत्कालीन नागरी विमान उड्डाण मंत्री, रवींद्र अधिकारी, त्यांच्या मंत्रालयातील काही अधिकार्यांसह तेरहाथुम जिल्ह्याला विमानतळ उभारण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्यासाठी निघाले होते. ज्या हेलिकॉप्टरमधून मंत्री आणि मंत्रालयाचे अधिकारी प्रवास करत होते, त्यात नेपाळच्या एअरलाईन्स इंडस्ट्रीतील मोठी ओळख असलेले आंगछिरिंग शेर्पा देखील होते. शेर्पा यति, तारा आणि हिमालयन एअरलाईन्सचे मालक होते. हे सर्व जण तेरहथुम जिल्ह्यातील चुहान डांडा एअरपोर्ट पुन्हा सुरू करण्याच्या निरिक्षणासाठी गेले होते.
9N AMI हेलिकॉप्टरने सकाळी ८ वाजता काठमांडूहून ६ प्रवाशांसह उड्डाण घेतलं. यानंतर सर्वजण नेपाळमधील पथीभरा मंदिरात दर्शनासाठी गेले. परत येताना हे हेलिकॉप्टर टेकडीवर आदळून अपघातग्रस्त झालं. यात सर्व प्रवाशांचा आणि पायलटचा मृत्यू झाला. दरम्यान पाच आसन असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये सहा जण प्रवास करत होते. यावरूनही सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्यावरुनही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.