नवी दिल्ली: पाच भारतीयांसह ७२ प्रवासी असलेले नेपाळचेविमान १५ जानेवारी रोजी कोसळून ६८ जण ठार झाले होते. त्यातील ३५ जणांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे.
सध्या या अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वास्तविक एटीसीने या विमानाला उतरण्याची परवानगी दिली होती, अशी माहिती समोर आली. विमान एअरस्ट्रिप क्रमांक ३० वर उतरावयचे होते. मात्र जेव्हा विमान जवळपास २४ किमी अंतरावर होते तेव्हा कॅप्टन कमल केसी यांनी एटीसीला सांगितले की, मला हे विमान एअरस्ट्रिप क्रमांक ३० वर नाही, तर एअरस्ट्रिप क्रमांक १२ वर उतरावयचे आहे. परंतु विमान उतरण्याआधीच विमान एका बाजूने झुकले आणि अपघात झाला.
सदर अपघाती विमान पोखरा येथील जुन्या व नव्या विमानतळाच्या दरम्यान सेती नदीच्या काठावर दरीत कोसळले होते. त्यावेळी बॉम्बस्फोटासारखा भयंकर मोठा आवाज झाला व त्यानंतर आसमंतात धूर पसरला, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. हे विमान घरांवर कोसळले असते, तर आणखी मोठी जीवितहानी झाली असती. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. विमान कोसळताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली होती. त्यानंतर काही वेळाने बचावपथकेही घटनास्थळी पोहोचली.
''खिडकीजवळ गॅप अन् टिश्यू पेपर''-
स्नॅपडील या कंपनीचे सह-संस्थापक आणि सीईओ कुणाल बहल यांचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी पोखराहून कधीही विमानाने प्रवास करू नका असे म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या जुन्या अनुभवांचा संदर्भ देत हे ट्विट केले आहे. कुणाल बहल यांनी ट्विटमध्ये त्याच्यासोबत घडलेल्या घटनेचा संदर्भ देत लिहिले की, 'ही घटना खरोखरच खूप दुःखद आहे. काही वर्षांपूर्वी माझी पोखराहून फ्लाइट होती. मी जेव्हा विमानाने प्रवास करत होतो तेव्हा खिडकीच्या कोपऱ्यातून हवेचा जोरदार प्रवाह येत होता. मी तक्रार केल्यावर त्या अटेंडंटने टिश्यू पेपर आणला आणि जिथून हवा येत होती तो गॅप भरला. या अनुभवानंतर मी ठरवलं होतं की, पोखराहून पुन्हा कधीच फ्लाइट घेणार नाही.
३० वर्षांत २७ अपघात-
नेपाळमध्ये गेल्या ३० वर्षांमध्ये २७ प्राणघातक विमान अपघात झाले. १९९२ मध्ये दोन मोठे विमान अपघात झाले होते. जुलै महिन्यात थाई एअरलाईन्सच्या विमानाला झालेल्या अपघातात ११३ जणांचा मृत्यू झाला तर सप्टेंबरमध्ये पाकिस्तान एअरलाईन्सचे विमान कोसळून त्यात सर्व १६७ जणांचा मृत्यू झाला होता.
हिमालयाचे आव्हान
नेपाळमध्ये वैमानिकांना खरे आव्हान हिमालयातील उंच पर्वत शिखरांचेच आहे. जुनाट विमानेही अपघातांना हातभार लावत आहेत. दुर्गम पर्वतीय भूभाग, प्रतिकूल हवामान, जुनी विमाने आणि अनुभवी वैमानिक यामुळे नेपाळला उड्डाणासाठी सर्वात धोकादायक देश बनवले आहे.