काठमांडू, दि.10- मासिक पाळीच्या काळात महिलांशी भेदभाव करुन त्यांना घराबाहेर दूर ठेवल्यास तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात येईल असा ठरावच नेपाळी संसदेने आज संमत केला. नेपाळमध्ये काही समुदायांमध्ये मासिक पाळीच्या काळात महिलांना गावाबाहेर लांब अरुंद दार असलेल्या लहानशा झोपडीत राहण्यास भाग पाडले जाते. याप्रथेला छाऊपडी म्हटले जाते.
याकुप्रथेविरोधात नेपाळच्या संसदेत कठोर पावले उचलण्याचे निश्चित केले. बुधवारी संमत झालेल्या ठरावानुसार या प्रथेला खतपाणी देणाऱ्या व्यक्तीला तीन हजार रुपयांचा दंड आणि तीन महिने कारावास ठोठावला जाऊ शकतो. साधारणतः वर्षभराच्या अवधीत या ठरावाला कायद्याचे स्वरुप प्राप्त होऊन तो अंमलात येणार आहे.
आज संमत झालेल्या कायद्यामध्ये छाऊपडी प्रथेचा अवलंब करणे तसेच पाळीच्या काळामध्ये मुलींशी कोणताही भेदभाव करणे हे मानवाधिकाराविरोधात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चाऊपदीच्या काळामध्ये महिलांना घराबाहेर काढले जाते. त्यांना कोणत्याही अन्नाला, धार्मिक प्रतिके, चिन्हे, देवता, पुरुष, पाळीव जनावरे यांना स्पर्श करण्याची परवानगी नसते. त्याचबरोबर त्यांना एकदम अरुंद दार असलेल्या छाऊगोठ नावाच्या झोपडीत राहण्यास भाग पाडले जाते.मागील महिन्यामध्ये छाऊगोठमध्ये एका मुलीचा स्पर्शदंशाने मृत्यू झाला होता. 2016 साली देखिल दोन महिलांचा या झोपड्यांमध्ये मृत्यू झाला होता. त्यातील एक महिला झोपडीतील धुरामुळे मरण पावली तर दुसरीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मते आजवर अनेक महिलांनी या प्रथेमुळे प्राण गमावलेले आहेत मात्र त्यांची नोंद झालेली नाही. नव्या विधेयकाच्या समितीसाठी काम करणाऱ्या नेपाळी खासदार कृष्णभक्त पोखरेल यांनी ठराव संमत झाल्यावर आनंद व्यक्त केला असून यामुळे चाऊपदी प्रथा नष्ट होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
छाऊपडीबद्दलः मासिक पाळीच्या काळात महिला अपवित्र होतात असा समज या नेपाळी समाजात होता. त्यामुळे महिलांशी हा भेदभाव केला जाई. पहिल्यांदा पाळी आल्यावर मुलीला गोठ्यामध्ये किंवा लहानशा झोपडीमध्ये दहा ते अकरा दिवस एकटीने काढावे लागत. तसेच नंतर प्रत्येक महिन्याला चार ते सात दिवस असे एकटीने राहावे लागत. या काळात पुरुषाला स्पर्श करणे वर्ज्य असते तसेच घराच्या अंगणातसुद्धा त्यांना प्रवेश दिला जात नाही. तसेच महिलांना दूध, दही, तूप तसेच इतर पौष्टीक पदार्थांना हातही लावू दिला जात नाही. त्यांना फक्त भात, मीठ आणि फळांवरच हे दिवस काढावे लागतात. तसेच तागापासून बनवलेली लहानशी गोधडीच वापरण्याची त्यांना परवानगी असते. या काळामध्ये मुलींना शाळेत पाठवले जात नसे तसेच अंघोळ करण्याचीही परवानगी नसते.