श्रीलंकेसारखीच आर्थिक दिवाळखोरीची परिस्थिती दहा भारतीय राज्यांवर येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असताना आणखी एक शेजारी देश बेहाल झाला आहे. नेपाळच्या अर्थव्यवस्थेवर दिवाळखोरीचे ढग दाटू लागले आहेत. यामुळे तेथील सरकारने निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकट आहे. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून श्रीलंका जेरीस आली आहे. असे असताना चीनच्या नादाला लागलेला तिसरा देश नेपाळदेखील आता कंगाल झाला असून वेळीत पाऊले उचलली नाही तर आर्थिक दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे.
यामुळे नेपाळ सरकार आणि तेथील राष्ट्रीय बँकेने मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. नेपाळला भारतातून इंधन पुरवठा होतो. तरी देखील तेथील पेट्रोल, डिझेल भारतापेक्षा स्वस्त आहे. असे असले तरी नेपाळच्या राष्ट्रीय बँकेने पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीवर नियंत्रण आणण्यास अर्थ मंत्रालयाला सांगितले आहे. याचबरोबर बँकांना उगाचच कोणालाही कर्ज देण्यासही मज्जाव केला आहे. २७ बँकांसोबत नेपाळच्या राष्ट्रीय बँकेने बैठक घेतली , तेव्हा वाहन कर्ज आणि गरजेचे नसलेले कर्ज देण्यात येऊ नये असे या बँकांना सांगण्यात आले आहे. नेपाळच्या या बँकेचा हा निर्णय बुडणाऱ्या अर्थव्यवस्थेला वाचविण्यासाठी असल्याचे सांगितले जात आहे.
नेपाळ सरकार दर महिन्याला पेट्रोलियम उत्पादनांसाठी भारताला २४-२९ अब्ज रुपये देते. परकीय चलनाच्या गंगाजळीत होणारी घसरण रोखण्यासाठी नेपाळ सरकारने चैनीच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. परकीय चलनाच्या साठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे नेपाळ सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. नेपाळच्याच वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. एनआरबीचे प्रवक्ते गुणाकर भट्ट यांनी त्यांना ही माहिती दिली आहे.
नेपाळ सरकारने सायकल, डिझाइन वाहने, मोपेड आणि अत्यावश्यक मोटर उपकरणे, तांदूळ, कापड उत्पादने, यंत्रसामग्री आणि सुटे भाग, सोने, तांदूळ, इलेक्ट्रिकल उपकरणे, तयार कपडे, चांदी आणि धागा यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. सिमेंट, खेळणी, जार, क्रीडा उत्पादने आणि संबंधित वस्तू, दगडी सजावटीचे साहित्य, चांदी, चांदीचे नक्षीकाम केलेले साहित्य, फायरप्लेसची भांडी, फर्निचर आणि संबंधित वस्तूंच्या आयातीसाठी लेटर ऑफ क्रेडिट (एलसी) देखील उघडले जाणार नाही. म्हणजेच पुढील आदेश येईपर्यंत आयात प्रतिबंधित राहणार आहे. नेपाळच्या बँकेकडे पुढील ६-७ महिने पुरेल एवढीच परकीय गंगाजळी शिल्लक आहे.