पावसामुळे नेपाळमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे मृतांचा आकडा २१७ च्या वर गेला आहे, तर २८ लोक बेपत्ता आहेत. गुरुवारपासून सुरू झालेल्या या आपत्तीने रविवारपर्यंत अनेक भागात मोठा विध्वंस सुरू ठेवल्याने हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. शुक्रवारपासून पूर्व आणि मध्य नेपाळचा मोठा भाग पाण्याखाली गेला आहे.
रविवारपासून काठमांडूतील हवामानात थोडी सुधारणा झाली असून त्यामुळे आपत्तीग्रस्तांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काठमांडू आणि नेपाळच्या इतर भागात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या मंगळवारी सकाळपर्यंत २१७ वर पोहोचली आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, गृह मंत्रालयाचे प्रवक्ते ऋषिराम तिवारी यांनी सांगितलं की, नैसर्गिक आपत्तीशी संबंधित घटनांमुळे आतापर्यंत २८ लोक बेपत्ता आहेत आणि १४३ लोक जखमी झाले आहेत.
पावसामुळे आलेल्या आपत्तीमुळे काठमांडू खोऱ्यात सर्वाधिक नुकसान झालं असून, तेथे मृतांचा आकडा ५० हून अधिक झाला आहे. नेपाळ आर्मी, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांसह २० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी शोध, बचाव आणि मदत सामग्रीच्या वितरणासाठी तैनात करण्यात आले आहेत. ऋषीराम तिवारी यांनी सांगितलं की, जखमींवर अनेक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या लोकांना तत्काळ मदत साहित्य पुरविण्यात येत आहे.
सरकारने शोध, बचाव आणि मदत वितरणाला प्राधान्य दिले आहे. रस्ते पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे, अनेक महामार्ग आणि रस्ते बंद झाले आहेत, शेकडो घरं आणि पूल गाडले गेले आहेत किंवा वाहून गेले आहेत आणि शेकडो कुटुंबे विस्थापित झाली आहेत. रस्ता वाहतूक खोळंबल्याने हजारो प्रवासी अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत.