काठमांडू : नेपाळला वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 24 जण बेपत्ता झाले असून 20 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहेत.
नेपाळमधील अनेक भागात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आला असून दरड कोसळल्या आहेत. तसेच अनेक महामार्ग पावसामुळे प्रभावित झाले आहेत. अनेक नद्यांचे तट तुटले असून जवळच्या गावांमध्ये पाणी घुसले आहे.
नेपाळ आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रमुख बेद निधी खानल यांनी वृत्तसंस्था एएफपीला दिलेल्या माहितीनुसार, देशात 200 अधिक भागात पावसाचा फटका बसला आहे. पूरग्रस्त भागात अन्न आणि गरजोपयोगी सामान पोहोचवले जात आहे. तसेच, पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.
राजधानी काठमांडूमध्ये सुद्धा काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे घर कोसळून झालेल्या घटनेत एकाच कुटुंबातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला. तर, पूर्वेकडील खोतांग जिल्ह्यात भूस्खलन होऊन आणखी तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.