काठमांडू: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि नेपाळच्या सीमेवरुन दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मधल्या कालावधीत या सीमाभागात शांतता होती. मात्र, आता पुन्हा एकदा नेपाळने सीमावाद उकरून काढला असून, भारतीय दूतावासानेही स्पष्ट शब्दांत नेपाळला समज दिली आहे.
नेपाळचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकता यांची पायमल्ली भारत करीत आहे. लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी हे भाग उत्तराखंडमध्ये असल्याचा दावा भारत करतो. मात्र हे भाग नेपाळचे अविभाज्य भाग आहेत. हे तीनही भाग आमच्या हद्दीत येतात. भारताने येथे सुरू असलेली कामे थांबवावीत. तसेच लष्कर हटवावे, असे नेपाळच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र, भारतीय दूतावासाने लगेचच याबाबत स्पष्ट भूमिका घेऊन समज दिल्याचे सांगितले जात आहे.
दोन्ही देशांचे संबंध मैत्रिपूर्ण आणि दृढ
भारत-नेपाळ आणि चीन यांच्या सीमा जेथे एकत्र येतात, त्या ठिकाणी लिपुलेख खिंडीच्या परिसरात भारताने रस्ता रुंदीकरणाचा मानस जाहीर केला आहे. त्यावर नेपाळमधील सत्ताधारी नेपाळी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. यावर, भारत-नेपाळ सीमेविषियी भारताची भूमिका सर्वश्रुत, सातत्यपूर्ण आणि नि:संदिग्ध आहे. दोन्ही देशांदरम्यान चर्चा करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी सध्याची यंत्रणा आणि प्रस्थापित नियमावली अत्यंत योग्य आहे. दोन्ही देशांचे संबंध मैत्रिपूर्ण आणि दृढ आहेत. त्यामुळे सीमावादाबाबतचे काही प्रश्न असल्यास ते या चौकटीतून सोडवले जाऊ शकतात, असे भारतीय दूतावासाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, सन १९९७मध्ये भारत आणि नेपाळ यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात गेल्या दोन दशकांपासून दोन्ही देशांतील सीमावाद अस्तित्वात असून, त्यावर चर्चा सुरू असल्याचे मान्य केले होते. नेपाळने काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या नव्या भौगोलिक नकाशात लिपुलेख, लिपिंयाधुरा आणि कालापानी हे भाग आपल्या हद्दीत दाखविले होते. भारताने हा दावा फेटाळला होता.