काठमांडू : भारत-नेपाळ सीमेवरील मुख्य मितेरी पूल नेपाळ पोलिसांनी मधेसी निदर्शकांवर बळाचा वापर करून खुला करून घेतला. गेल्या ४० दिवसांपासून मधेसी समुदायाचे लोक निदर्शने करीत असून सीमेवरील मुख्य बीरगंज- रक्साऊल हा व्यापारी भाग प्रथमच मोकळा झाला आहे. देशाच्या नव्या घटनेमध्ये जास्तीचे प्रतिनिधित्व मिळावे व प्रांतांच्या सीमांची आखणी नव्याने करावी अशी मधेसी समुदायाची मागणी आहे. त्यासाठी गेल्या ४० दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरू असून त्यात ४० पेक्षा जास्त लोक ठार झाले आहेत.सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पोलिसांनी निदर्शकांचे तंबू जाळले, त्यांच्यावर लाठीमार केला. बीरगंज-रक्साऊल हा व्यापारी भाग खुला करण्याचा पोलिसांनी प्रयत्न करताच पाच निदर्शकांना अटक करण्यात आली.भारत आणि नेपाळ यांच्यातील ७० टक्के द्विपक्षीय व्यापार बीरगंज-रक्साऊल येथून होतो, असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते लक्ष्मी प्रसाद ढाकल यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)