नेपाळमधून धक्कादायक बातमी येत आहे. मदन-अश्रित महामार्गावर भूस्खलन झाल्याने दोन बस मातीच्या लोंढ्यासह शेजारील नदीत कोसळल्या. या बस जोरदार पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्या आहेत. दोन्ही बसमध्ये ड्रायव्हर आणि प्रवासी असे ६३ जण होते, असे सांगितले जात आहे.
त्रिशूली नदीवर ही दुर्घटना घडली आहे. पंतप्रदान प्रचंड यांनी सरकारी एजन्सींना बचावकार्याला वेग आणण्याचे आदेश दिले आहेत. परंतू प्रचंड पाऊस आणि पाण्याचा वेग जास्त असल्याने यात अडथळे येत आहेत.
हा भाग मध्य नेपाळमध्ये येतो. सुमारे ६० प्रवासी होते, तर तीन जण ड्रायव्हर होते. हे प्रवासी पर्यटक की स्थानिक हे अद्याप समजू शकलेले नाही.
चितवनचे मुख्य जिल्हा अधिकारी इंद्रदेव यादव यांनी ANI ला सांगितले की, “प्राथमिक माहितीनुसार दोन्ही बसमध्ये बस चालकांसह एकूण 63 लोक होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास दरड कोसळल्याने बसे वाहून गेल्या. आम्ही घटनास्थळी आहोत आणि शोध मोहीम सुरू आहे. संततधार पावसामुळे हरवलेल्या बसचा शोध घेण्याच्या आमच्या प्रयत्नांना अडथळे येत आहेत,”