Nepal Plane Crash: 4 भारतीयांसह 22 प्रवशांना घेऊन जाणारे विमाननेपाळमध्ये कोसळल्याची घटना घडली होती. आता या अपघातग्रस्तविमानाचे फोटो समोर आले आहेत. मुस्तांग भागातील कोबानमध्ये या विमानाचे अवशेष सापडले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की या विमानाचे तुकडे झाले. दरम्यान, रेस्क्यू टीम आणि नेपाळी मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व 22 जणांचा मृत्यू झाला आहे.
या विमानात 4 भारतीय आणि 3 जपानी नागरिकांसह 22 प्रवासी होते. भारतीयांमध्ये ठाण्याच्या चौघांचा समावेश आहे. या विमानाने पोखरा ते जोमसोमसाठी सकाळी 9.55 वाजता उड्डाण घेतले होते. उड्डाण घेतल्याच्या 15 मिनिटानंतर विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर अपघात झाल्याची माहिती समोर आली. स्थानिक लोकांनी नेपाळ लष्कराला दिलेल्या माहितीनुसार, विमान मानपती हिमालय भूस्खलनात लामचे नदीच्या मुखाशी कोसळले आहे. नेपाळचे पत्रकार गौरव पोखरेल यांनी या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले आहेत.
ठाण्यातील चौघांचा मृत्यू
लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळ लष्कर जमीन आणि हवाई मार्गाने घटनास्थळाकडे जात आहे. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सैन्यदलासह स्थानिक लोकही मदत करत आहेत. अपघात इतका भीषण होता की, मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. अपघातात ज्या भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ते चौघेही महाराष्ट्रातील ठाण्याचे रहिवासी होते. अशोक कुमार त्रिपाठी, पत्नी वैभवी बांदेकर-त्रिपाठी आणि दोन मुले धनुष आणि रितीका अशी त्यांची नावे आहेत.