काठमांडू: वैमानिक मानसिक तणावाखाली असल्यानं यूएस-बांग्ला एअरलाईन्सच्या विमानाचाअपघात झाल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे. तणावाखाली असलेला वैमानिक रडू लागला. त्यानंतर त्याचं विमानावरील नियंत्रण सुटलं आणि विमान कोसळलं, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. मार्च महिन्यात यूएस-बांग्ला एअरलाईन्सचं विमान नेपाळमध्ये अपघातग्रस्त झालं होतं. यामध्ये 51 जणांचा मृत्यू झाला होता. हे विमान ढाक्याहून काठमांडूला जातं होतं. ढाक्याहून काठमांडूला जाणारं यूएस-बांग्ला एअरलाईन्सचं विमान 12 मार्चला कोसळलं होतं. वैमानिक अबिद सुलतान तणावग्रस्त असल्यानं ही दुर्घटना घडल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे. तणावाखाली असलेल्या अबिदनं चुकीचे निर्णय घेतल्यानं विमानाला अपघात झाला. नेपाळ सरकारनं केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. विमान उड्डाण करताना अबिद अतिशय तणावाखाली होता. त्याच्या वर्तणुकीत मोठा फरक जाणवत होता, अशी माहितीदेखील तपासातून पुढे आली आहे. ढाका ते काठमांडू या तासाभराच्या प्रवासादरम्यान सुलताननं अनेकदा धूम्रपान केल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. 'अपघाताच्या चौकशीसाठी आम्ही कॉकपिटमधील व्हॉईस रेकॉर्डर तपासला. त्यामध्ये अबिदचं सहवैमानिकासोबतचा संवाद रेकॉर्ड झाला आहे. तो अतिशय तणावग्रस्त असल्याचं त्याच्या संभाषणातून स्पष्ट जाणवलं. मानसिक ताण तणाव आणि अपुरी झोप याचा परिणाम अबिदवर झाला होता. तो अनेकदा रडतदेखील होता,' असं तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात नमूद केलं आहे.
पायलट रडायला लागला आणि विमान कोसळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 10:20 AM