Nepal Plane Crash:नेपाळमध्ये रविवारी(दि.15) एक मोठा विमानअपघात झाला. नेपाळमधील पोखरा इथं एक प्रवासी विमान कोसळलं, ज्यामध्ये तीन मुलांसह 68 प्रवासी होते. या विमानात दोन भारतीय नागरिकांसह 11 परदेशी प्रवासीही होते. या अपघातानंतर नेपाळ आर्मी, सशस्त्र पोलीस दल, आणि स्थानिक नागरिक बचाव कार्यात गुंतले.
36 मृतदेह बाहेर काढलेअपघाताची माहिती मिळताच विमानतळ आणि विमान कंपन्यांसह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. नेपाळी लष्करासोबतच बचाव पथकही तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. अपघातानंतर बराच वेळ घटनास्थळावरुन धुराचे लोट उठताना दिसत होते. बचाव पथकानं आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढले आहेत.
पंतप्रधान थेट विमानतळावरनेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना प्रभावी बचाव कार्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेबाबत त्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठकही घेतली. बैठकीनंतर पंतप्रधान प्रचंड आणि गृहमंत्री रवी लामिछाने थेट काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावरील नियंत्रण कक्षात पोहोचले. सध्या पंतप्रधान आणि गृहमंत्री नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
अपघात कसा झाला?मिळालेल्या माहितीनुसार, यति एअरलाइन्सच्या ATR-72 विमानानं काठमांडूहून पोखराकडे उड्डाण घेतलं होतं. या 72 सीटर विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते, म्हणजे एकूण 72 लोक होते. विमान पोखराजवळ पोहोचलंच होतं, तेव्हा अचानक ते कोसळलं. नेपाळी मीडियानुसार, पोखरातील जुनं देशांतर्गत विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हा अपघात झाला.