Nepal Plane Crash:नेपाळमध्ये रविवारची सुरुवात मोठ्या घटनेनं झाली. नेपाळमधील पोखरा इथं एक प्रवासी विमान कोसळलं, ज्यामध्ये तीन मुलांसह 68 प्रवासी होते. विमानात पाच भारतीय आणि 10 इतर परदेशी नागरिकांसह एकूण 72 लोक होते, या सर्वांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे.
यती एअरलाइन्सच्या विमानानं काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सकाळी 10.30 वाजता उड्डाण घेतलं होतं आणि हे विमान पोखरा इथं उतरणार होतं, पण लँडिंगपूर्वीच अपघात झाला. दोन महिन्यांपूर्वी याच विमानतळाजवळ थाई एअरवेजचे विमान कोसळून 113 जणांचा मृत्यू झाला होता. याआधीही नेपाळमध्ये अशाप्रकारचे अनेक विमान अपघात झाले आहेत.
नेपाळमधील विमान अपघात
- मे 2022: तारा एअरद्वारे संचालित विमानाचा अपघात होऊन 16 नेपाळी, चार भारतीय आणि दोन जर्मन नागरिकांसह विमानातील सर्व 22 लोकांचा मृत्यू झाला होता.
- एप्रिल 2019: सुलोखुंबू जिल्ह्यातील लुक्ला विमानतळावर विमान क्रॅश झाले. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता.
- फेब्रुवारी 2019: तेपलजंगमधील पाथीभरनजवळ हेलिकॉप्टर कोसळले, यात 7 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात केंद्रीय मंत्री रवींद्र अधिकारी यांचाही मृत्यू झाला.
- सप्टेंबर 2018: गोरखाहून काठमांडूला जाणारे हेलिकॉप्टर जंगलात कोसळले, यात एका जपानी नागरिकासह सहा जणांचा मृत्यू झाला.
- मार्च 2018: काठमांडूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ यूएस-बांगला एअरलाइन्सचे विमान कोसळले. त्यात 51 जणांचा मृत्यू झाला होता.
- फेब्रुवारी 2016: पोखराहून जोमसोमला जाणारे विमान कोसळले. यामध्ये सर्व 23 प्रवाशांचा मृत्यू झाला. नंतर तपासात असे समोर आले की खराब हवामान असूनही क्रूने विमान ढगांच्या आत नेण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे हा अपघात झाला.
- मे 2015: भूकंपानंतर, मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले अमेरिकन सैन्याचे हेलिकॉप्टर अपघाताला बळी पडले, ज्यामध्ये 6 अमेरिकन सैनिक, दोन नेपाळी लष्करी अधिकारी आणि 5 नागरिकांचा मृत्यू झाला.
- जून 2015: सिंधुपाल चौकात हेलिकॉप्टर कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला.
- मार्च 2015: धुक्यामुळे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुर्की एअरलाईन्सचे विमान धावपट्टीवरून घसरले. या अपघातात सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
- फेब्रुवारी 2014: पोखरा ते जुमला जाणारे नेपाळ एअरलाइन्सचे विमान अर्घाखांची येथे क्रॅश झाले, 18 लोक ठार झाले.
- सप्टेंबर 2012: काठमांडूहून लुक्लाला जाणारे सीता एअरचे विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्रॅश झाले, ज्यात सर्व 19 प्रवासी ठार झाले.
- मे 2012: पोखराहून जोमसोमला जाणारे अग्नि एअरचे विमान जोमसोम विमानतळावर कोसळले. त्यात भारतीय भाविक होते. या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला होता.