India Nepal Relations: नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड 23 सप्टेंबर रोजी चीनच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. प्रचंड 7 दिवस चीनमध्ये राहणार असून यादरम्यान ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत. प्रचंड यांच्यासोबत त्यांची मुलगी गंगा आणि परराष्ट्र मंत्री एनपी सौद यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्री चीनला जाणार आहेत. प्रचंड यांच्या चीन दौऱ्यापूर्वी भारत आणि नेपाळमध्ये वीजेबाबत मोठा करार झाला आहे. भारत आणि नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही देशांमधील वीज व्यापार वाढविण्यास सहमती दर्शवली असून त्यासाठी अनेक ट्रान्समिशन कॉरिडॉर उघडले जातील.काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, संयुक्त तांत्रिक समितीच्या 14 व्या बैठकीत ढलकेबार-मुझफ्फरपूर ट्रान्समिशन लाइनद्वारे विजेचा व्यापार वाढविण्यावर सहमती झाली. याशिवाय विद्युत व्यापाराला गती मिळावी यासाठी सीमापार विद्युत लाईनच्या बांधकामाला गती देण्याचे मान्य करण्यात आले आहे. या करारानुसार ढलकेबार-मुझफ्फरपूर ट्रान्समिशन लाइनद्वारे 800 मेगावॅट ते 1000 मेगावॅटपर्यंत वाढ करण्याचे मान्य करण्यात आले आहे.
दोन्ही देशांनी नौतरवा-मैनैया लाइन ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे मान्य केले आहे. त्याचा वापर वीज आयात आणि निर्यात करण्यासाठी केला जाऊ शकतो. भारतासोबतच्या या ताज्या कराराद्वारे नेपाळ विजेची निर्यात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांच्या नवी दिल्ली दौऱ्यात भारत सरकारने पुढील 10 वर्षांत नेपाळकडून 10,000 मेगावॅट वीज खरेदी करेल, असे आश्वासन दिले होते. नेपाळमधील चीनच्या राजदूताने अलीकडेच नेपाळच्या भारतासोबतच्या वाढत्या संबंधांवर नाराजी व्यक्त केली होती. चीनला भारत आणि नेपाळमधील मैत्री आवडत नाही आणि म्हणूनच तो देशाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही तर नेपाळ आणि अमेरिका यांच्यातील एमसीसी करारावरही चीनचा आक्षेप असून जिनपिंग आणि प्रचंड यांच्यातील चर्चेत हा मुद्दा पुढे येऊ शकतो, असे मानले जात आहे.