बीजिंग- नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली पुढील आठवड्यात चीनच्या भेटीवर जाणार आहेत. यावेळेस ते चीन व नेपाळ विशेष आर्थिक क्षेत्राबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. हा प्रकल्र चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचाच एक भाग आहे.खड्गप्रसाद ओली चीनमध्ये 19 ते 24 जून या पाच दिवसांसाठी असतील. या भेटीत ते चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग व इतर नेत्यांची भेट घेतील असे चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बेल्ट अँड रोड इनिशएटिव्हला भारताने गेल्या आठवड्यात शांघाय येथे झालेल्या एससीओ बैठकीमध्ये विरोध दर्शवला होता. मात्र रशिया, पाकिस्तान व इतर मध्यआशिय़ाई देशांनी त्यास पाठिंबा दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीस उपस्थित होते मात्र भारत या योजनेला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. या योजनेमुळे नेपाळवर भारताऐवजी चीनचा प्रभाव वाढिस लागण्याची शक्यता आहे. नेपाळच्या पंतप्रधानपदी पुनर्निवड झाल्यानंतर ओली यांची ही पहिलीच चीनभेट आहे. या पदावरती पुन्हा आल्यानंतर ओली यांनी पहिली भेट भारताला देऊन भारत व चीन या दोन्ही देशांशीही समान संबंध ठेवू असे संकेत दिले होते. त्यांच्या भेटीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नेपाळला भेट दिली. यामुळे दोन्ही देशांमध्ये विविध सामंजस्य करार करणे शक्य झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमध्ये जनकपूर ते अयोध्या अशा बसचा शुभारंभही केला होता.