काठमांडू :नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी नरमाइची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. नेपाळमधील राजकीय गोंधळ वाढत असताना पंतप्रधान केपी शर्मा ओली भारताबाबत मवाळ झाल्याचे दिसून येत आहेत. भारत आणि नेपाळ चांगले मित्र असल्याचे ओली यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केपी शर्मा ओली बोलत होते. भारत आणि चीनमध्ये चांगले संबंध असून, या मैत्रीत तिसरा देश येऊ शकत नाही. भारत आणि नेपाळमधील मैत्री ही स्वाभाविक आहे, असे ओली म्हणाले. ओली सध्या भारतासोबत जवळीक वाढवून पक्षामधील नाराज नेते आणि देशातील जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले जात आहे.
याच मुलाखतीत ओली यांनी चीनला खडे बोल सुनावले आहेत. आमचा देश सर्व निर्णय स्वतंत्रपणे घेतो. चीनने नेपाळच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ करू नये. अन्य देशांचे आदेश आम्ही मानणार नाही, असेही ओली यांनी सांगितले आहे. दुसरीकडे, ओली यांचा हा राजकीय डाव असल्याचे सांगितले जात आहे. भारतासोबतचे संबंध पुन्हा सामान्य करत कोरोना लसीचा पुरवठा भारताकडून होईल, हे सुनिश्चित करण्याचा ओली यांचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कालापानी-लिंपियाधुरी-लिपुलेख हे प्रदेश नेपाळचा भाग असून, ते भारताकडून घेऊच, असा पवित्रा ओली यांनी घेतला होता. मुसद्दी मार्गाने भारताशी चर्चा करून हे तीनही भूभाग पुन्हा घेतले जातील. सन १९६२ मध्ये भारत-चीन युद्धानंतर भारतीय सैन्य या ठिकाणी तैनात करण्यात आले. मात्र, आता हे तीन भूभाग भारताकडून पुन्हा एकदा नेपाळमध्ये घेऊ, असे ओली यांनी म्हटले होते.