काठमांडू - लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणीसह ३९५ किमी भारतीय प्रदेश नेपाळने आपल्या नकाशात दाखवल्यानंतर आता पुन्हा एकदा नेपाळ कुरापती काढत आहे. या प्रदेशात अवैधरित्या घुसलेल्या नेपाळी नागरिकांची घुसखोरी वैध आहे असं नेपाळनं सांगितले आहे. नेपाळच्या धारचुला जिल्हा प्रशासनानं भारताच्या पत्राला उत्तर देताना दावा केला आहे की, नकाशा आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी हा भाग नेपाळच्या क्षेत्रात येतो.
या महिन्याच्या सुरुवातीला भारताने नेपाळला त्यांच्या नागरिकांना अवैधरित्या लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी या भागात घुसखोरी करण्यास थांबवावं असं आवाहन केले होते. या संबंधात धारचूला(उत्तराखंड)च्या उपजिल्हाधिकारी अनिल कुमार शुक्ला यांनी नेपाळ प्रशासनाला पत्र लिहिलं होतं. आता नेपाळने या पत्राला उत्तर दिलं आहे. नेपाळच्या धारचुला भागातील मुख्य जिल्हा अधिकारी शरद कुमार यांनी दावा केला केला आहे की, लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी या नेपाळचा भाग आहे.
शरद कुमार यांनी पत्राला दिलेल्या उत्तरात लिहिलं आहे की, सुगौली करार, नकाशा आणि ऐतिहासिक पुरावे याआधारे लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी हा नेपाळच्या कार्यक्षेत्रात येतो, त्यामुळे भारत या भागात नेपाळी लोकांच्या प्रवेशावर बंदी आणू शकत नाही. हा नेपाळचा भाग असल्याने या क्षेत्रात येणे-जाणे नेपाळी नागरिकांसाठी सर्वसामान्य आहे. यापूर्वी १४ जुलै रोजी भारतीय अधिकारी अनिल कुमार शुक्ला यांनी एका ईमेलच्या माध्यमातून नेपाळी लोकांना या भागात अवैधरित्या घुसखोरी करण्यापासून रोखावं असं नेपाळला सांगितले होते.
तब्बल २९ वर्ष ११ महिन्यांपूर्वी ‘मी पुन्हा येईन’ असं नरेंद्र मोदी म्हणाले होते अन् अखेर तो क्षण आलाच
तसेच अशाप्रकारे बेकायदेशीर घुसखोरी दोन्ही देशाच्या प्रशासनासाठी संकट निर्माण करु शकते. नेपाळने अशाप्रकारच्या घुसखोरीची माहितीही भारताला द्यायला हवी. भारतासोबत सीमावादादरम्यान नेपाळने लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी हा भारतीय भाग नेपाळच्या नवीन नकाशात दाखवला आहे. पण भारताने नेपाळच्या या कृत्याचा निषेध करुन नवीन नकाशाला मान्य करण्यास नकार दिला आहे. नेपाळने नवीन नकाशास त्यांच्या संसदेत मान्यताही दिली आहे पण भारताने स्पष्टपणे लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी हा भारताचाच भाग असल्याचं सांगितले आहे.