ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २६ - शनिवारी आलेल्या भूकंपानंतर सलग दुस-या दिवशीही नेपाळमध्ये भूकंपाची मालिका सुरुच आहे. रविवारी पहाटेपासून ते सकाळपर्यंत नेपाळमध्ये भूकंपाचे आठ धक्के बसले असून भीतीपोटी नागरिकांनी रस्त्यावर प्रार्थना करत घराबाहेरच रात्र काढली.
रविवारी पहाटेपासून ते सकाळपर्यंत नेपाळमध्ये भूकंपाचे सहा धक्के बसले असून या भूकंपाची तीव्रता कमी होती. तर दुपारी १२.४१ आणि त्यानंतर एकच्या सुमारास पुन्हा भूकंपाचे दोन धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ६.७ तर ५ एवढी होती. भूकंपाचा केंद्र बिंदू नेपाळमधील कोडारी येथे होता. या धक्क्यांनी भारतही हादरला आहे. उत्तर भारताततील पंजाब, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली, आसाम या राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपानंतर रविवारी दुपारी दिल्ली व कोलकात्यातील मेट्रो सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली होती.
शनिवारी आलेल्या भूकंपामुळे नेपाळमधील नागरिक घाबरले असून अनेकांनी रात्र घराबाहेर काढली. अनेकांनी मोकळ्या जागेत मुक्काम ठोकला व भजन - प्रार्थना करत रात्र काढली. भूकंपामुळे नेपाळमध्ये सुमारे १९०० हून अधिक जण मृत्यूमुखी पडले असून मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत. नेपाळमधून आत्तापर्यंत सुमारे ५५० भारतीयांची सुटका करण्यात आली असून आज दिवसभरात तिथे अडकलेल्या सर्व भारतीयांची सुटका करु असे हवाई दलाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. नेपाळमधील या भीषण भूकंपानंतर नेपाळ सरकारने देशभरात १० दिवसांची सरकारी सु्ट्टी जाहीर केली आहे.