ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. १४ - नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्राचा दर्जा देण्यास घटना निश्चित करण्यासाठी भरलेल्या घटना सभेने (कॉन्स्टिट्युअंट असेम्ब्ली) नकार दर्शवला असून त्यामुळे देशाच्या काही भागात हिंसक घटना घडल्या आहेत. अनेक शतके हिंदू राष्ट्र अशी बिरुदावली लावलेला नेपाळ २००६ मध्ये राजघराणे बरखास्त झाल्यानंतर सेक्युलर देश म्हणून घोषित करण्यात आला. मात्र, तेव्हापासून नेपाळची घटना कशी असावी हा प्रश्न अधांतरी राहिला आहे. सर्व पक्षांच्या सहमतीने अखेर ही घटना मार्गी लावण्यावर व लोकशाहीची स्थापना करण्यावर एकमत झाले आणि रविवारी नेपाळची घटना निर्माण करण्यासाठी एकेका मुद्यावर मत घेणं सुरू झालं. या देशाला हिंदू राष्ट्र म्हणावं का हा प्रश्न आला त्यावेळी दोन तृतीयांश सदस्यांनी विरोध दर्शवला आणि नेपाळ सेक्युलर राष्ट्र राहील, हिंदू नाही हे स्पष्ट झालं. मात्र, यानंतर देशातल्या अनेक शहरांमध्ये विशेषत: दक्षिणेकडच्या शहरांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या निदर्शनांमुळे हिंसक परिस्थिती उद्भवली असून अनेक ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला आहे.
नेपाळमध्ये हिंदू बहुसंख्य असून अनेकांची तर राजे हे विष्णूचे अवतार असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांना नेपाळ हे केवळ हिंदू राष्ट्र नकोय तर राजेशाही हवी आहे. मात्र, आजच्या सोमवारच्या विद्यमान संसदेच्या बहुमताच्या पार्श्वभूमीवर नेपाळ हिंदू राष्ट्र म्हणून पुन्हा अवतरणार नाही हे स्पष्ट झाले आहे.