रविवारी नेपाळमधील पोखरा येथे यति एअरलाईन्सचे विमान क्रॅश झाले. या विमानात 68 प्रवाशांसह एकूण 72 जण होते. यति एअरलाइन्सचे एटीआर-72 विमान पोखरा विमानतळावर पोहोचण्याच्या 10 सेकंद आधी हा अपघात झाला. नेपाळच्या पोखरा विमानतळाचे 14 दिवसांपूर्वीच त्यांच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.
पोखरा विमानतळ चीनच्या मदतीने उभारण्यात आले आहे. त्याच्या उभारणीसाठी चीनच्या एक्झिम बँकेने नेपाळला कर्ज दिले होते. 1 जानेवारी 2023 रोजी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय आणखी एक माहिती अशी की, ज्या विमानाचा अपघात झाला त्याच विमानाचे उद्घाटनाच्या दिवशी डेमो फ्लाय करण्यात आले होते.
विमानाला लँडिंगची परवानगीपोखरा विमानतळ प्राधिकरणाकडून असे सांगण्यात आले आहे की, विमानाचा अपघात झाला तेव्हा यति एअरलाइन्सचे विमान धावपट्टीपासून अवघ्या 10 सेकंदाच्या अंतरावर होते. एटीसी कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पोखराची धावपट्टी पूर्व-पश्चिम दिशेला बांधलेली आहे. विमानाच्या पायलटने आधी पूर्वेकडून उतरण्याची परवानगी मागितली होती आणि परवानगी मिळाली होती, पण काही वेळातच वैमानिकाने पश्चिमेकडून उतरण्याची परवानगी मागितली आणि पुन्हा परवानगी मिळाली. नागरी उड्डाण प्राधिकरणाचे म्हणणे आहे की लँडिंगच्या आधी विमानात ज्वाळा दिसत होत्या, त्यामुळे खराब हवामानामुळे हा अपघात झाला असे म्हणता येणार नाही.
चौकशीसाठी समितीया अपघाताच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारने सोमवारी राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे . मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय या विमान अपघाताच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
विमानात 5 भारतीयएजन्सीनुसार या विमानात नेपाळचे 53, भारताचे 5, रशियाचे 4, दक्षिण कोरियाचे 2, आयर्लंडचे 1 अर्जेंटिना आणि फ्रान्सचे 1 नागरिक होते. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड आणि गृहमंत्री रवी लामिछाने आपत्कालीन बैठकीनंतर थेट काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर पोहोचले. त्यांनी त्या ठिकाणी नियंत्रण कक्षाकडून परिस्थितीचा आढावा घेतला. या अपघातानंतर भारताचे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीदेखील शोक व्यक्त केला.