काठमांडू : धार्मिक विधी म्हणून जगात सर्वाधिक प्राण्यांची कत्तल करण्यात येणाऱ्या नेपाळमध्ये नरबळीची घटना घडल्यामुळे देश हादरून गेला आहे. भारतीय सीमेजवळील कुदिया या गावात नदीकाठी दहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याचा गळा चिरण्यात आला होता. जीवन कोहर असे या मुलाचे नाव असून तो मंगळवारपासून बेपत्ता होता व त्याच दिवशी शेजाऱ्याने गावकऱ्यांना पंगत दिली होती. पंगतीदरम्यान आपल्या मुलाला भूतबाधा झाली असून ती काढून टाकण्यासाठी नरबळी द्यावा लागणार असल्याचे तो म्हणाला होता. मात्र, त्याचे हे म्हणणे कोणीही गांभीर्याने घेतले नाही, असे जीवनचे आजोबा राम बरन कोहर यांनी सांगितले. मुलाच्या मृत्यूप्रकरणी ११ लोकांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्यांत ज्या आजारी मुलासाठी नरबळी दिला गेला तो बिजय चमार (वय १८) व त्याच्या कुटुंबियांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक जगत बंधू पोखारेल यांनी चमारचा पिता कोदाई चमार याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)
नरबळीच्या घटनेने नेपाळ हादरला
By admin | Published: July 29, 2015 1:51 AM